बॅटमॅन टू मधला आवाज येणारी जागा आणि वैयक्तिक सुटका

बॅटमॅन आता काही त्यांच्या नेहमीच्या काळ्या रंगाच्या कपडयात दिसत नाही, तो आपल्यासारख्या ख-या माणसासारखां वावरत असतो. तुम्ही तो बॅटमॅन बघितला असाल जो नेहमी उडत असतो….. संपूर्ण ताकदीने त्यांच्या शत्रूचा मुकाबला करतो….. हा तोच तो….. तो आता थकलाय….. साफ दुबळा ठरला….. त्यांच्या समोर बेन नावाचा तोंड आणि नाक झाकलेला बलदंड शरीराचा शत्रू उभा ठाकला आणि बॅटमॅन त्यांच्या समोर टिकाव धरु शकला नाही, हो, मी बॅटमॅनच्या तीन पार्टच्या सिरीजमध्या शेवटच्या पार्टची वार्ता करतोय, तुम्ही बघितलाय का नोलनचा द डार्क नाईट राईझस, त्यांत त्या बॅटमॅनला तो चेहरा ढाकलेला बेन एका अज्ञात जागी डांबतो. चारही बाजूनीं बंद अश्या जागेत मान वरती केली की फक्त मोकळं आभाळ दिसतं….. बाहेरुन किल्यासारख्या दिसण्या-या आणि आतून भल्ली मोठी गोलाकार भिंत असलेल्या त्या भागातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे आणि हो तुम्हाला तिथूंन निसटण्यासाठी आकांडतांडव करण्याची गरज नाही, फक्त एका मजबूत रश्शीच्या साहाय्याने बाहेर पडायचं. डोक्याच्यावरती दिसणा-या आभाळाकडे बघत रश्शीचा आधार घेत बाहेर पडायचं, ती रश्शी तुमच्या कमरेला बांधण्यात येईल, जर का भितीवरुनं चढताना तुमचा हात निसटला तर तुम्ही कोसळून डायरेक्ट जमिनीवर न कोसळता लटकत राहाल, रश्शीमुळे तिथंल्याच गोलाकार भिंतीच्या एखादया बाजूला जोरदार आपटाल, बॅटमॅन आता कमजोर झालाय त्यांला हे सगळं पार करुन इथूंन निसटणं शक्य होईल का याबदल जबरी शंका आहे, तो आपली सगळी ताकद आजमावून पहिला प्रयत्न करायला सुरवात करतो, तिथंच असलेला एक मजबूत देहयष्टीवाला माणूस त्यांच्या कमरेभोवती रश्शी बांधतो, बॅटमॅनला तुथून निसटायचं असतं, त्या गोलाकार भितींच्या वरच्या टोकाकडून येणारा प्रकाश त्याला खुणावत असतो, तो तयार होत असताना तिथला एक म्हातारा तिथल्या काही गोष्टी सांगतो जसं की आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केलेतं ते अपुरे पडलेत, ते मरण पावलेत, फक्त एका लहानग्याने प्रयत्न केला होता. त्या लहानग्याने तिथूंन निसटणं जर सत्य असलं तरी बॅटमॅनच बाहेर पडणं शक्य वाटतं नाही, बॅटमॅन खितपत पडलाय, तो बाहेर पडण्यासाठी प्रयत्न सुरु करतो, तेव्हा तिथली माणसं ओरडायला लागतात….. कदाचित त्या लोकांनी त्यांच्यात ती आशा बघितली असेल तिथून बाहेर पडण्याची…..  तिथं असलेले बाकी लोक जमा होतात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी…..  का कोण जाणे?….. पण ओरडायला लागतात, हा झाला त्या पिचरच्या स्टोरीतला भाग, तर तो मी तुम्हाला का सांगतोय?

**********

तर अशेच खुप सारे गर्तेत सापडलेले बॅटमॅन आजूबाजूला वावरत असतात, खितपत पडतात……. प्रयत्न करतात….. परत आपल्या दुनियेत जाण्यासाठी…..  आणि त्यांच्या भोवतीसुदधा अशीच आरडाओरड सतत चालू असते, ती सतत सांगत असते की इथून निसटं तुला बाहेर जाऊन भिडयाचयं….. लढायचयं…..  आता तुम्ही म्हणाल इथलां बॅटमॅन कोण, तर तुम्ही आम्ही सामान्य माणसं….. यातली निम्म्याहून अधिक हतबल होत घराबाहेर पडत…..  नुसती दोनवेळच्या जेवणाची खळगी भरण्यासाठी बाहेर पडलेली…… ज्यांना आपला खरा अवतार….. हो……..तोच तो…… बॅटमॅनवाला अवतार घेवून, काही प्रश्न विचारण्याची, त्यांच्याशी लढण्याची ताकद ठेवणारी परिस्थितीच ठेवलेली नाही, त्यां नतद्रष्ट बेननी इतके लचके तोडले की तुम्हाला घराबाहेर पडत नोकरी करण्याशिवाय पर्याय नाही, आता या भल्यामोठया चक्रातून बाहेर पडणं अशक्य वाटतं, तुमचं आतलं मन आतल्या आत खदखदत असतं, तुम्हाला काहीतरी सांगू पाहत असतं, पण तुम्ही ते सगळं डावलून बाकी लोकांसारखं निमूटपणे नोकरी करणं भाग असतं. बरं एकदा का नोकरी करु लागलात की मग प्रवास ही येतोच आणि नोकरी महानगरातली असली की मग रोजचा प्रवास हळूहळू अंगवळणी पडतो, सुरवातीला त्रास होतो, मग सवय होते, मग त्यातलं रोजपण कम्फरटेबलपणा आणतं….. जगण्याशी जुळवून घेता….. आता जगणं सुसहय आणि सुकर वाटू लागतं, तुमच्या आतला तो बॅटमॅन ज्याला इथून बाहेर पडत आपल्या जगात जाऊन मोठी लढाई जिंकून पराक्रम गाजवायचाय, पण या अज्ञात सवयीच्या झालेल्या जागेतून कसं बाहेर पडायचं? या रोजच्या घरापासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत जाण्याच्या प्रवासात तुम्हाला वाहन बदलावी लागतातं, या बदलात मध्येच कुठेतरी तो तुमच्यातला बॅटमॅन कुठुनतरी जागा होतो, कुठेतरी त्याला आवाज यायला लागतात, कुठेतरी हा जीवनक्रम बदलावासा वाटतो, त्या पिचरमध्यला बॅटमॅनला तो जेव्हा जेव्हा तिथूंन बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा ती आजूबाजूची माणसं ओरडू लागतात, सांगतात की निसट येथून, किमान आम्ही नाही गेलो तू तरी जा, मी पुढे सांगत असलेलं सगळं अशाचं जागेबदल.

तुम्ही तिथं जाणं तेव्हाच शक्य असेल जर तुम्हाला पैसे वाचावयचे या हेतूने शहरातल्या शहरात एखादया निश्चित भागात रेल्वे स्टेशनपासून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा भाग व्हायचा असेल तरच, अन्यथा रिक्षा स्टॅन्ड आहेच. किवां काही वेळा अचानक गरज पडली म्हणून किंवा मग अन्य कोणता मार्गच नसेल तरच फक्त. बाकी गर्दी म्हणाल तर ती एकावेळी हजारो माणसं येत जात असतात. त्यातली बहुसंख्य  जाऊन रेल्वेस्थानकाला जाऊन थडकणारी जरी असली तरी अजून खूप सारी माणसं या रेल्वेस्थानकातून बाहेर होत शहराच्या आत कूच करत असतात, बरं बाकी सगळी माणसं रोज रोज त्याचं वाटेने जाणारे असतील असं काही नाही, एवढया सगळ्या गर्दीत नवीन एखादा येवून विचारतोच, “की समोर जाणारी बस कुठे जाईल” किंवा “इथं जाणारी बस कुठली म्हणून”, हा टिपिकल बस स्टँड नव्हे, लोक या भागाला सॅटीस म्हणतात. कुठलीच उदघोषणा होत नाही. गाडया पाच मिनिटामिनिटाला येत असतात, बरं हे सगळं गाडयांच्या ये-जाची मॅनेजमेंट करायला काही लोकांसाठीची रुम एकाबाजूला …… अजूनही कित्येक महिनोमाहिने ती तशीच…… आणि यात परत इतर ड्राईव्हर, कंडक्टर आणि त्यांची इतर लोकं बसतात ती वेगळी….जेवण खान पान हे इथं होत….. नाही…. कंडक्टर, ड्राईव्हर लोक, ते मग बसमध्येच जेवतात एखादया शांत कोप-यात गाडी लावत.

एका उडडाणपूलासारख्या रस्त्याची तीन भागात विभागणी करुन तीन संमातर रस्ते करत, त्या प्रत्येक रस्तयाच्या ठराविक अंतरावर एका एका रस्त्यावर तीन ते चार बसस्टॉप असे एकूण तिथं अकरा बसस्टॉप आहे, तस तिथंल्या प्रत्येक बसस्टॉपला लावलेल्या पाटीवर नजर टाकली की मग सगळ्यात मोठा आकडा अकरा दिसतो आणि मग उगाच सगळे बसस्टॉप मोजून काढायचा मोह होतो. इथं बसस्टॉपला उभंच राहवं लागतं, बसण्याची सोय नाही, गोलाकार असलेल्या दांडयाना ठराविक अंतरावर काटकोनी वळण घेत बनलेले हे बसस्टॉप, गोलाकार दांडयावर बूड टेकवण्याइतकाच काय तो आधार, तरीही एखादा बसण्याचा प्रयत्न करतोच, तशी ही प्रत्येक बसस्टॉपवर नाही म्हटलं तरी जास्तीच जास्त दहा-दहा मिनिटानीं गाडी आहेच, सकाळच्या वेळेला गाडयान मागून गाडया जातात पण बसस्टॉपवरची गर्दीवाढतच जाते, तर तुम्ही नुसते उभे राहयलात की तिकीट काढायला कंडक्टर लगेच तिथं येतो, हे करण्यामागे एकदा का गाडी आली की त्या आतल्या कंडक्टरवर पुढच्या प्रत्येक बसस्थानकावर चढणा-या प्रवाश्यांसोबत तिकीट काढण्याचं आलेलं प्रेशर कमी करण्यासाठी, प्रत्येक बसस्टॉपच्या वर होर्डिगं लावण्यासाठी जागा, हॉडिगवर जाहिराती, बहुतेक करुन अनिमेशन क्लासच्या, साडयांच्या दुकानाच्या दिसतात त्यासुदधा फारच कमी ठिकाणी, बाकी ठिकाणी दिसतात त्या बॅनर नसल्यामुळे उघडयापडलेल्या टयूबलाईटस.

त्या मधल्या सॅटीसच्या दोन्ही बाजूला स्कॉयवॉक, हा सॅटीस एखादया उडडाणपूलासारखा बांधलाय, रेल्वेस्टेशन समोर येणारी कोणतीही बस शहरात जाण्यासाठी यांच्याच वापर होतो. फक्त हा बसस्टॉपच्या भागात फुगवल्यासारखा केलाय जिथं त्याला तीन रस्ते फुटलेत आणि त्यातच बसस्टॉपची विभागणी झालीय, हा रस्ता पुढे दोन भागात विभागला जातो, एक तलावाच्या दिशेने, दुसरा रेल्वेस्टेशनजवळच्या रस्त्याला जाणारा. सॅटीसच्या खाली रिक्षा स्टॅड, म्हणजे ज्या रस्त्यावरुन आपली बस जातेय त्यांच्या खालून माणसं जातायतं….. आता कळलं, रेल्वेस्टेशनवरुन इथं वर सॅटीसवर येतानाच्या पाय-या चढलं की असं वाटतं की कुठल्यातरी दुस-या दुनियेतचं प्रवेश केलाय, आपण सहज चौफेर नजर टाकली की दिसतात ती माणसचं माणस आणि ती पण सतत चालत असलेली इकडून तिकडे, तिकडून इकडे. ही अशी माणसं बघितली की मग आपलं वेगळपण उरतं नाही “आपण पण त्याच्याचं सारखंच तर जगतोय”, किंवा मग
“आपण एकटेच थोडी असं किडयां मुग्यासारखं जगतोय, ही लोक देखील आहेच की” तुमच्या आतल्या एका मनाला थोडाका होईना आसरा भेटतो.

**********

अख्खं शहर धावत पळत असत असं म्हणतात पण हे प्रत्यक्षात जिथं घडत ती ठिकाणं म्हणजे रेल्वेस्टेशन, मुख्य रस्ते आणि ते देखील ऐन सकाळच्या नऊच्या नंतर सुरु होणा-या पीक अवरसला, आणि ते सुदधा हे जर मुख्य शहराच्या दिशेने जाण्यासाठी असेलत तर विचारायलाच नको, जोरात धावत पळत, वेळेशी स्पर्धा करत जगण्याचा झगडा चालू असतो, जगाचा रहाटगाडा चालतो म्हणतात ना तो हा असा. माणसांमागून माणसं जात असतात, कोणी शिडया चढत असत कोणी उतरत असत, कुणी काय माल विकत असत, कुणी नुसतचं इकडं तिकडं बघत असतं, कुणाचं काय तर कुणाचं काय……

विश्वाच्या प्रसरणासारखी नुसती पसरत चालेली मुंबई जिचे सगळे असतील नसतील ते सगळे गुण अंगी भिनवत उभ्या असलेल्या शहरांपैकी हे एक शहर, त्यांचा हा रेल्वेस्टेशनचा परिसर, आणि तो देखिल सकाळच्या वेळेला. रेल्वेच्या तिकिटासाठी लागलेल्या रांगा, त्या मशीनवर तिकीट काढून देण्यासाठी नेमलेला तिकीट मास्टर, जर तुम्ही पास काढायचा तर या मशीनचा उपयोग नाही, तुम्हाला तिथं कांऊटरवर जाऊनच पास काढावा लागतो, या शिवाय स्मार्ट कार्ड वापरुन तिकीट काढणारे वेगळे. या शिवाय आणखी या रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर थोडसं बाहेर एक रुपया कमिशन जास्तीचा देऊन तिकीट काढणारे अजून वेगळे तिथं ही जाम गर्दी, या शिवाय नेतेमंडळी, समाजसेवक, नविन योजना आणि नेहमीच्या सूचना, रेल्वेशी निगडीत माहिती, आदोंलन यांचे लटकलेलं बॅनर यांची ठिकठिकाणी केलेली मांडणी. पण बरं एंवढया सगळ्या गजबजहाटातसुदधा तुम्हालां तुमच्यापुरता का होऊना एकटयासाठी एखादा शांत कोपरा सहज मिळतो, बाकी दुनिया हालचाल करत असताना आपण निपचितपणे नुसतं एकटक एकटं सततच्या वर्दळीकडे, त्या माहौलाकडे बघत आपलं आपलं अस्तित्व यांच्या सोबत फरफटत जगत वाया तर घालवतं नाही आहोत ना यांची किंचितशी विचारांची पायवाट जगण्याच्या अनाहूत प्रवासाची आठवण करुन देते, त्याचं वेळी कुठूनतरी आपण एकटेच थोडी असे जगतोय सांगणार एक मन, किंवा मग यातून बाहेर कसे पडणार असं सारखं सारखं मनाला विचार पाडायला लावणारं टोचणं, एकामागोमाग सगळं सगळं मन आठवू पाहत, “या शहराला एका बॅटमॅनची गरज आहे आणि तो तुम्ही बनू शकता” मन प्रोत्साहित होत पण दुस-याचं क्षणाला उदास “काहीतरीच काय?” इथंपर्यंत विचार येतो, इतक्या लोकांमध्ये आपण कसे वेगळे ठरणार, नाही माहित. बाकी आरडाओरडा म्हणाल तर विशेष काही नाही, तुम्ही या मोठाल्या बस स्टॅडवर शिरकाव केल्यावर प्रत्येक बसस्टॉपला तुम्हाला क्रमांक टाकलेले दिसतील एक दोन तीन चार असे, त्या प्रत्येकाच्यां खाली मराठीत बस क्रंमाक आणि स्थानकांची नाव दिसतील काही ठिकाणी पहिल्या सकाळच्या बसची आणि शेवटच्या रात्रीच्या बसची माहिती लिहिली असेल, काही ठिकाणी नुसतीच नाव लिहिली दिसतील, तुमच्यातल्या बॅटमॅनला जिवंत ठेवयाचं असेल तर तुम्हाला प्रोत्साहनाची त्या जोरात ओरडत कानठाळ्या फोडत येणा-या आवाजाची गरज असते त्या पिक्चरसारखी.

**********

तुम्हाला तो आवाज ऐकायचा असेल तर बसस्टॉप क्रंमाक एक आणि दोनच्या मध्ये उभं राहायचं, आणि समोरच्या पाच आणि सहा नंबरच्या बसस्टॉपकडे बघायचं, एकवर उभे राहाल तर उजव्या बाजूला स्कॉयवॉक दिसेल त्यांच्या पलिकडे डोंगर रांग दिसेल आणि डोळे शाबूत असेल तर मग त्या डोंगरावर असलेले विजेचे टॉवर पण दिसतील, पाठी मागे रेल्वे स्टेशचा अजून एक पूल, ईशान्येस बघितल तरं भारतरत्न डाँ. आंबेडकराचा पुतळा आणि त्यांच्या समोरचं हॉटेल दिसेल, वायव्येस अजून एक स्कॉयवॉक त्याला महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी याचं दिलेलं नाव दिसेल. नैऋत्यस रेल्वेचं तिकीटघर. चौफेर नजर पडल्यावर नजरेस पडण्या-या या काही ठळक जागा.

तुम्हाला जर का तो बॅटमॅनला प्रोत्साहित करणारा आवाज तटस्थपणे अनुभवायचा असेल तर आपण बसस्टॉपवर उभे न राहता बाहेरच्या बाजूस उभं राहावं, पण तो आवाज प्रत्येकवेळी येईल यांची गॅरटी नाही, जर तो आवाज परफेक्ट ऐकायचा असेल तर काही पुढील परिस्थिती उदभवणं गरजेचं आहे.

  • त्या पाच नंबरच्या बसस्टॉपवरुन तो ऐन चाकरमान्यांच्या कामाच्या वेळी आवाज येणार आहे तिथं मागची किमान वीस मिनिटं तरी बस आलेली नसेल,
  • त्या बसस्टॉपच्या बाहेर आता रांग सरकू लागलेलीं असेल…..
  • बरं जितकी लोक वाढत जातील तशी रांग मोठी होत जाईल शिवाय तितकीच लोक रांगेबाहेर बसस्टॉपच्या अवतीभवती सुदधा गर्दी वाढत दिसतील.
  • रांग आता बसस्टॉपचं आवार ओलाडून पार बाहेर येऊ लागेल, आणि वाढतचं जाईल.
  • कंडक्टर तिकिट तिथंच बसस्टॉपवर काढून घेत असेल, त्यामुळें इतर लाईनतल्या लोकांना उशीर होत असून देखील रांगेतून बाहेर होत रिक्षा पकडणं आता कठीण होऊन जाईल, झक मारुन तिथं बस येण्याची वाट बघतं उभं राहण्याशिवाय दुसरा काही पर्याय नसेल,

बरं ही गर्दी बघून कोण नव्याने लाईनीत उभं राहील असं वाटतं नाही, इकडं बसस्टॉप बाहेर उभं राहलं की बस आल्यावर लगेच आतमध्ये शिरायला भेटण्याची शक्यता जास्तच किंवा अजून एक, इथं उभे राहणारे बहुतेकजणं शहरातल्या अंत्यत आतल्या भागात नव्या बांधकामासाठी मागवलेले बाहरचे मजूर, हा पल्ला बाकीच्या स्टॉपवरच्या शेवटच्या स्थानकापेक्षा लांबचा त्यामुळे नाईलाजाने का होईना लोक ते निमूटपणे सहन करतात, तुम्हाला काही तिकडे शेवटच्या स्थानकावर जायचं नंसत पण या लोकांची होणारी घुसमट तुम्हाला काहीतरी सांगत असते, लोक आपआपासात बोलायला लागतात, सुरवातीला बस ड्राईव्हर, कंडक्टर यांना शिव्या घालतात, पण गाडी काय येत नाय, मग आपले राजकारणी, मग ते पण झाले की येतं ते पब्लिकचं गांडू असल्याचं बोलणं, पंधरा मिनिट होत आली असली तरी गाडी काय येतं नसते. लोक तातकळायला लागलेत, समोर दिसणा-या कंडक्टरकडे विचारपूस सुरु झालीय, तिकडून ही काही प्रतिसाद यायला लागत नाही, बहुतेकांच्या हातात एकतर मोबाईल असतो त्यांच्या माना त्यातं खूपसलेल्या असतात, ते ही करुन झालं की मग डाव्या हातात जर घडयाळ असेल तर मग त्यांच्याकडे लक्ष गेलं की चेहरा केविलवाणा होतो आता पुढचं काहीचं वेळेवर होणार नाही असं वाटतं राहतं, तुम्ही एकदम पदधतशीर निरिक्षण चालू ठेवता.

**********

या बसचा रोजचा प्रवास म्हणजे तुमच्या आयुष्यात एकाच तंद्रीत ठराविक परिघात आयुष्य जगत असल्याची लक्षण असून त्यामुळे मग एक साचेबंदपणा आयुष्याला चिकटतो.  

**********

एकदाची गाडी येताना लांबून दिसते, बसस्टॉपवरची लाईनीतले लोकं एकमेकांला धक्के दयायला सुरवात करतात, याशिवाय बसस्टॉपच्या बाहरे पण तेवढेचं लोक दिसतात, जशी गाडी जवळ आली तशी बसस्टॉपच्या बाहेरची माणसं आत शिरायला सुरवात करतात, आता त्या लाईनतल्या लोकांचा संयम अनावर होतो, मग सगळी ती लाईनतली जनता जोरात ओरडू लागते त्यांचा आवाज दुमदुमवून टाकतो, हाच तो आवाज जो तुम्हाला इथूंन लवकरात लवकर बाहेर पडत स्वतःची सुटका करुन घेण्यास सांगतो.

**********

एखादा बसस्टॉप बाहेर उभा असलेला…… गाडी बसस्टॉपवर यायच्या दोन तीन सेकंद अगोदर झपकन आत शिरतो, लोक जोरजोरात ओरडत त्यांचा निषेध करतात, जोरात ओरडू लागतात, काही बिथरलेले जण परत बाहेर पडतात…… काही धीटपणा दाखवत तसेच गाडीत बसून राहतात. तुम्हाला त्याच्याशी काही घेण-देण नसतं, तुम्हाला जिंवत आवाज कानात साठवून ही रोजची धावपळ, आखीव रेखीव दुस-यांची चाकरी करत चाललेली नोकरी सोडण्यास प्रोत्साहन घ्यायचयं…….

तुम्ही हा तमाशा निमूटपणे पाहत बसता……. या जजांळातून सुटका कधी होणार…… हे शरीर थकल्यावर हा ‘आत्मा अमर आहे’च्या गोष्टी मनात भिनवून घेतल्यावर कसला सुचतोय भौतिक उत्कर्ष….. नाही तुम्हाला येथून बाहेर पडावं लागेल हे असं रोजचं नऊ ते पाचच्या नोकरीत मन रमण्याअगोदर स्वत:ची सुटका करुन घ्यायला हवी….. तुम्हाला या चालू घटनातूनच काहीतरी प्रेरित होणारं शोधावं लागेल आणि सुटका करावी लागेल….. तुम्हाला माहित करुन घ्यावं लागेल इथूनं कोण कोण निसटलं आहे ते, त्यांनी केलेल्या चुका, त्यांनी केलेली मात यांचा अभ्यास करावा लागेल, तुम्हाला त्या प्रत्येक कसोटीतून जावं लागेल ज्यातून बाहेर पडलेले तुम्ही तावून सलाखून बाहेर पडलेले असालं….. ज्यांचा जग हेवा करेल असे तुम्ही असालं….. जगाला अंचबित करण्याची ताकद तुमच्यात असताना इथं असं जगणं ही सगळी शोकांतिका तुम्हाला मोडित काढावी लागेल….. त्या बॅटमॅन सारखी एकदा रिस्क घ्यावीच लागेल ती रश्शी सोडून त्या भिंतीचा आधार घेत तुम्हाला या डांबून ठेवलेल्या जागेतून सुटका करावी लागेल…..

******** समाप्त********

-लेखनवाला    

( All Copyrights with The writer . Permission from the writer is mandatory before  publishing the article or the part thereof . Not to be shared in quotes , or paragraphs . If shared online, must be shared in totality . )

Leave a comment