हिजडा आणि क्रमवार निरीक्षणं

हिजडा आणि निरीक्षणं : क्रंमाक एक : कचरेवाला

रोज सकाळ व्हायची, तो कामाला जायला निघायचा, मेन रस्त्याअगोदर तिथं एक हनुमानाचं छोटसं मंदिर होतं आणि बरोबर त्यांच्याअगदी समोर एक भलमोठं गणपतीचं मंदिर दोन्हीकडे अनुक्रमे शनिवार आणि मंगळवारी गर्दी असायची, त्यांच्यापुढे सुरु व्हायचा रेल्वेस्टेशनला जाणारा रस्ता आणि बसस्टॉप, समोर येणारी बस पकडण्यासाठी बसस्टॉपच्या अगोदरच त्या हनुमान मंदिरापाशी लोक जमा होतं, तिथं तो ही यायचा, जर तिथं बस भेटली तर पकडायची नाहीतर सरळ चालत रेल्वेस्टेशन गाठायचं, त्यासाठी अर्धा तास लागायचा. त्या हनुमानमंदिराला पाठमोरी कंचराकुडी होती, मोठा डंपर म्हणणा, तो लोखंडी डंपर नेहमी कच-याने भरलेला असायचा, बहुतेक घरातल्या बायका रात्री जेवल्यानंतर शतपावलीच्या निमित्ताने तिथं कचरा टाकायला यायच्या, याशिवाय काही लोकं सकाळी कामाला जाताना घराचा कचरा इथं टाकायचे, तो परिसर अख्खा भरुन जायचा, सगळ्या शहरातल्या कंचराकुडीच्या परिसराची हीच अवस्था होती, मग सकाळी साडेआठ नऊ वाजता महानगरपालिकेची घंटागाडी त्यांच्या कर्मचा-यांसोबत यायचें, त्या डंपरमधला सगळा कचरा त्या घंटागाडीत भरायचे. डंपरची रचनाचं तशी होती, हा तो डंपर त्या गाडीला लावायचा आणि आपोआप डंपरमधला कचरा त्या घंटागाडीत टाकाला जायचा, याशिवायही उरलेला कचरा त्या गाडीत टाकायला महापालिकेची माणसं होती, तिथल्या त्या घाणेरडया, कुजट वासात ते नेहमी वावरायचे, बाकी आजूबाजूने जाणा-या लोकांना एक क्षण ही हा वास सहन होत नाही, नाकपुडया दुखायला लागतात, लगेच रुमाल आणि ओढण्या बाहेर येतात, हया घंटागाडीसाठी काम करणारे बहुतेक सगळी माणसं दणकट होती, फावडी घेवून ते एका चटईत ते कचरा गोळा करायचे आणि मग तो कचरा त्या गाडीत टाकायला अजून काही माणसं होती, हया सगळयात एक पुरुष होता जो साफ तोंड असलेला चेह-यावर पुसटशी ही दाढी न ठेवणारा, पूर्णपणे एकदम टाईट टी-शर्ट घेतलेला, नेहमी टाईट नाईटी टाईप पॅन्ट घातलेला पण त्याचे हात बायकासारखे वळायचे, केस पण बायकासारखे लांबलंचक… त्या केसांना तो साधा ‘बो’ टाईप रबर लावायचा, हातात हिरव्या बांगडया घालायचा, गळयात मंगळसूत्र, छाती मात्र पुरुषांची, त्या हनुमान मंदिरात बायकांना प्रवेश नव्हता हा सुदधा नाही जायचा, या अश्या लोकांना काय म्हणतात ठाऊक नव्हतं सुरवातीला.

हिजडा आणि निरीक्षणं : क्रंमाक दोन : सभोवतालचं अस्तित्व

सुरवातीला यांच्याबदल तितकीशी माहिती नव्हती, होती ती फक्त उत्सुकता का ही लोक अशी वेगळी आहेत म्हणून, सगळ्यात पहिली गाठ पडली ती एरियात एका नुकत्याच बाळंत झालेल्या बाईला मूल झालं म्हणून एकशे एक्कावन्न आणि साडी मागण्यासाठी आलेली ही लोकं, ती ने आतून दाराला कढी लावलेली, ते बाहेरुन दरवाजे जोरात ठोकवत होते, आजूबाजूची लोक या असल्या लोकांच्या नादी न लागता त्या बाईला पैसे दयायला सांगतात, त्यांचा आशिर्वाद चांगला असतो असंही सुचवतात, साडी नाही दिली म्हणून मग एकशे एक्कावन्नचे पाचशे एक्कावन्न होतात, ती बिचारी काकुळतीला येऊन तितके पैसे नसल्याचं सांगितल्यावरसुदधा ते मागे हटायला तयार नसतात, शेवटी ती बिचारी शेजा-यांकडून उसने पैसे घेवून तिथल्या संगळ्या गोष्टीचा निपटारा लावते. याव्यतिरिक्त दारोदारी भीक मागायला येणारे, “छूटा नही है” किंवा मग “माफ कर” म्हणायचे की तें पुढल्या दाराला वळतात, आजूबाजूचीं लोक यांच्या कहाण्या सांगत बसतात, यांचा कुणी गुरु असतो, यांची मयत बाकी लोकांना बघू दिली जात नाही…. अश्या इतर खूप सा-या, यांची अजून गाठ पडते ती ट्रेनमध्ये पैसे देणा-याच्या डोक्यावर  आशीर्वाद देणारे, आणि न देणा-याशी हुज्जत घालत किंवा मग नकोत्या भागाला हात लावत किंवा याशिवाय जास्तच असेल तर मग नेसलेली साडी असेल तर मग परकर वर करत सगळचं दर्शन दाखवून देणारे. अशावेळी एकच डोक्यात येतं की सरकार काही करत का नाही ठोस यांच्यासाठी, व्याकरणातल्या तो, ती नंतर च्या ‘ते’ला का मान्यता नाही?, त्यांच्या भावनानां वाट का नाही?, का ही लोक आपली युनियन/संघटना बनवत हल्लाबोल रचत? का समाज म्हणून आपण यांच्याकडे चांगल्या नजरेने समानतेची भाषा करत नाही?, यांच्या अश्या असण्याचा आपण का विचार करत नाही?, का यांना अजूनही असं भिखा-यासारखं आयुष्य जगावं लागत? अजून असा कोणता महापुरुष जन्माला यावा लागेल ज्यांने हयाचे आयुष्य बदलून इतर समाजासारखं यांना जगवलं जाईल?, जिथं याचीं ही मेन वस्तीत घर असतील, हयाची ही दुकानं असतील, लोक हयाच्याशी सहजतेने बोलतील, व्हवहार करतील, माणुसकीचं नात जपलं जाईल, समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात यांच प्रतिनिधित्व असेल, उदया ही लोक सुदधा डॉक्टर, इजिनिअर, वकील असतील……

हिजडा आणि निरीक्षणं : क्रंमाक तीन : माध्यमातली दखल

टीव्हीवरच्या एका कार्यक्रमात लक्ष्मी त्रिपाठी यांना बघितलं त्या मराठी बोलत होत्या, काहीतरी आश्वासक काम या एकूणच समाजासाठी होतयं हे बघून बरं वाटलं, मी म्हणून काही न करणा-या आपल्या सारख्या लोकांना अश्या सामाजिक काम करणा-या लोकांना बघितलं की आपसूकच काहीतरी नक्की चागलं होईल असं वाटत राहतं, भले आम्ही आमचं काडीचंही योगदान देणार नसलो तरी, या समाजासाठी काम करणा-या एनजीओ आहेत…… ते करतात काहीतरी….. हे आमचं खुशालचेंडूवाल्याचं म्हणणं, पण जोपर्यंत समाज आतून बाहेरुन पूर्णपणे बदलत नाही तोपर्यंत प्रश्न बदलणार नाहीत हे सुदधा आम्हीच म्हणतो….

या हिजडा समाजाच्या अस्तित्वाचे रामायण आणि महाभारतातले दाखले देणारा हा ‘आपला समाज’ किन्नराबदल आधुनिक अश्या अनाकलनीय, अनभिज्ञ अश्या दंतकथा कश्या काय उभ्या करतो?, इथल्या चित्रपटातून यांना केवळ उपहास, दोन घटकेची करमणूक म्हणून का दाखवलं गेलं? इथल्या प्रमुख राजकीय पक्षांनी हिजडा आघाडी का नाही स्थापन केली, यांना दुर्लक्षित ठेवण्यातच त्यांना स्वारस्य होतं का जाणे? का त्यांची वोटिगं कार्ड बनली नव्हती? का मेल, फिमेल शिवाय अजून एक कॉलम टाकायला कायदे बनवण्यात सरकारं दंग होत नाही? का तर हा हिजडा समाज कुरुप दिसला?  यांच्याभोवती ग्लॅमर नाही म्हणून मिडिया प्रश्न मांडत नाही? यांना जवळ केलं की आपली नेहमीची वोट बॅक थू थू करेल किंवा फीदीफीदी दात काढत बसेल? एवढी वर्षे का वाया घालवलीत आणि अजून पुढची किती वाया घालवणार……?

हिजडा आणि निरीक्षणं : क्रंमाक चार : शरीर आणि निर्सग

सुरवातीला काही कळत नव्हतं, आजूबाजूचं जग अज्ञानीच होतं, आणि अश्या गोष्टीचं अमृत पाजायला लागणारे मित्र या बाबतीत भयकंर अनुभवी होते तरीदेखील हे असं म्हणजे वेगळं म्हणजे काय हे समजायला उशीर झाला….म्हणजे हे लोक आपरेशन करुन शरीर बनवून घेतात का? अशी का गरज पडते? गरज, त्यांच शरीर पुरुषाचं असतं मन मात्र बाईचं असतं एकदा एकाने त्यांच्या माहितीतलं मला सांगितलं, हे असं पण करतो निसर्ग, म्हणजे नर की मादी यातल्या एक बनवत असताना चुकून त्यातं दुसरं काहीतरी मिश्रण जोडलं जातं आणि मग काहीतरी वेगळं बनून येतं, जशी सयामी मुलं होतात, जशी एखादया मुलालां सहा बोट येतात तसचं, अजून खूप सा-या अवयवाची खूप सारी संरचना निसर्ग बदलत असतो, त्यानें बनवून सोडलं की मग इकडे आपलं जग असतं आपले कायदे, कानून, पंरपरा असतात ते आपण निसर्गाने बनवलेल्या शरीराला लावतो वा काय समाज म्हणून लॉजिक आहे….मग बाईचं मन असतं म्हणजे नेमकं काय, त्यांना पुरुषाचें कपडे घालून वावरण्यात प्रॉब्लम येतो काय? याशिवाय मग अजून एक प्रश्न पडायचा की हे ‘गे’ लोक कोण? ट्रान्सजेंडर कोण? एकदा तो झुकरबर्ग फेसबुकवर कम्पेन करत होता एलजीबीटी कम्युनिटीचं….तेव्हा पहिल्यादां यांच जग काय ते कळालं….खूप सा-या प्रश्नांची उत्तर इंटरनेटने दिली….पण आजूबाजूचे प्रश्न तसेच होते….आपल्याकडे 377 आरटिकलच्या निकालावेळी अशीच जोरदार चर्चा झाली… तेव्हा अजून कळालं…..

हिजडा आणि निरीक्षणं : क्रंमाक पाच : जीएसटी आणि उपजीविकेची साधन

जीएसटीमुळे जकातनाके बंद झाले, रात्रीच्या अंधारात त्या जकातनाक्यापाशी थांबणारे ट्रक ड्राइव्हर बंद झाले. ट्रक ड्राइव्हरला देशभर माल पोचवायचा असतो सततच्या प्रवासात आखडणारं शरीर, तंटपुजा पगार आणि खाणं आणि हवामानामुळे शरीराची होणारी आबाळं या सगळ्यात लैगिक खाज मिटवण्याचा कमीवेळातला कमी खर्चिक जालीम उपाय काय तर त्या जकातनाक्यावर उभे असलेले छक्के, हे काय करतात, ठाऊक नाही? मग तुम्ही संस्कारी आहात! आईवडील उगाच नाही सांगत सातच्या आत घरी यायला, ते सगळं जाऊदे पण जीएसटी आल्यामुळे नुकसान झालेल्यामध्ये यांचा देखील समावेश होतो, तरीदेखील काही ठराविक जागेत याचें पूर्वीचे अडडे आहेतच, काही उडडाणपूलांच्या जागा, मोकळ्या मैदानाकडच्या आडोश्याकडच्या जागा आणि बरेच असे अडडे…

हिजडा आणि निरीक्षणं : क्रंमाक सहा : उपभोक्ता ग्राहक वर्ग आणि सर्विस

तो पागल होता, घरुन पाच हजार रुपये घेवून यायचा, जेव्हा केव्हा तलप आली असं वाटलं की त्या कॉलेजच्या पाठीमागे असलेल्या रेल्वेफाटकापाशीच्या त्या अंधा-या खोपटयात जायचा, तिथं आधीपासनूच काही गि-हाईक असली की काकुळतीला यायचा, त्यांला धीर करावयाचाच नाही, त्याला फक्त छाती हवी असायची बाकी काही नाही, आतला माणूस बाहेर आला की हा खिश्यातले तीनशे रुपये त्या छक्क्याच्या हातात ठेवायचा आणि सुरु व्हायचा….. फक्त दहा मिनिट करायचे तीनशे… पण तो थांबायचाच नाही….  पार अर्धा-अर्धा तास तिथूंन त्या खोपटयातून बाहेरचं पडायचा नाही, बाजूने जाणा-या लोकल ट्रेनचा आवाज तेवढा डिस्टर्ब करायचा, मी आणि खूप सारी जणं नुसतं हे अनुभवायला त्यांच्यासोबत जायचो…. तो साला डाबिस होता पण जिगरवाला होता पार संत्सग वैगेरेना उपस्थिति लावून हे करायचा हे विशेष, त्याला हे संगळ चालायचं तो म्हणायचा वेश्याकडे जाण्यापेक्षा हे बरं…. साला एडसचा धोका नाही, कधीकधी तिथले छक्के आम्हाला पण ट्राय करायला सांगायचे, “पैसे बाद मैं दे” बोलायचे, हा, सोडवणूक सोपी होती, फक्त एकदा “नाही” म्हटलं की नुसतेच हसायचे, माणसांची कमी नव्हती त्या खोपटयापाशी.

हिजडा आणि निरीक्षणं : क्रंमाक सात : पारदर्शकता 

कमी माणसं असलेल्या लोकल डब्यात शिरत, हे दोघं पार लालेलाल लिपस्टिक ओठाला फासतात, छाती थोडीशी पुंढ उघडी करत भीख मागणं चालू होतं नेहमीचचं, देणारे देत होते, ज्यांने एकाकडे पैसे मागून झालयं त्यानें पुन्हा दुस-याकडे मागायचं नाही हा अलिखित नियम होता आणि तो तिथं पाळला जात होता, आता नवीन स्टेशन आलं काही माणसं उतरली काही चढली, या दोघाचं आपलं पैसे मागण्याचं काम चालू होतं, त्या तिथं गाडीत अजून दोन किन्नर चढले, आता, त्या तिथं असलेल्या दोघांच्या हे लक्षात आलं, त्या गाडीत चढलेल्या दोघांच्या हे ध्यानात नव्हतं, त्या मगाच्या दोघांनी त्या आता चढलेल्या किन्नरांची पाठून जाऊन मान दाबली, गाडीत बसलेल्या प्रवाशांना हे कळायला वेळ लागला, हे नंतरचे दोघे ‘फेक’ किन्नर होते….मर्द बनके भीं ऐसे काम करते हो”…. याला बेरोजगारीचा परिणाम म्हणावं की उदयोगाची चाचपलेली नवी संधी…. पेपरात नंतर बातमी आली होती काहीजण नकली हिजडे बनून ट्रेनमध्ये फिरतात अशी…..इतकंच…

हिजडा आणि निरीक्षणं : क्रंमाक शून्य : आशा

त्यांच्या संस्थेने आता सामाजिक स्तरावर बरचं नाव कमवलं….आज तो नवीन घोषणा करणार होता….टाळ्या वाजल्या….त्यानें माईक हातात घेतला आणि म्हणाला….आपण तृतीयपंथीयांना रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी उपक्रम सुरु करणार….जोरदार टाळ्या वाजल्या…

-लेखनवाला    

( All Copyrights with The writer . Permission from the writer is mandatory before  publishing the article or the part thereof . Not to be shared in quotes , or paragraphs . If shared online, must be shared in totality . ) 

Leave a comment