बाई, खोली आणि कर्म

मागचे दोन भाडोत्री करारनाम्या अगोदरच खोली खाली करुन निघून गेले. एकाचा अनुभव असता तर ठीक होतं, पण असं दोघां-दोघांना अश्याप्रकारचा अनुभव कसा काय येऊ शकतो?…….. “अहो! भाडोत्री नंतर बघू, आधी तुम्ही या घराची वास्तूशांती करुन घ्या…… भटाला विचारुन!” दोन घर सोडून पलीकडे राहणारा शेजारचा एकजण सुधीरला बोलला. रिकाम्या असलेल्या रुममध्ये भाडोत्री मिळावा यासाठी तो इथं आसपासच्या लोकांना सांगण्यासाठी आला होता, मागच्या वर्षी मे महिन्यात त्याने या एरियात ही बैठया चाळीतली रुम विकत घेतली, तिथल्या चालू बाजारभावापेक्षा रुम स्वस्तात होती. हा आता, रेल्वेस्टेशनपासून पाच किलोमीटर आतमध्ये होती, पण, जाण्या-येण्यासाठी बाकी व्यवस्था चांगली होती, पाणी, वीज, शाळा, दवाखाना, बाजार सगळंच जवळ-जवळ होतं. सुधीर इथं राहत नव्हता तो राहायचा पार ठाण्याला आणि ही बैठया चाळीतली रुम शहापूरला त्यामुळे आठवडयाच्या सुटटीलाच येणं इथं शक्य होतं. त्याचें सासरे रिटायर झाले गवर्नमेंट जॉबमधून, त्यांच्या चाळीस वर्षाच्या सर्विसचे, पेंशनचे आणि गॅरच्युटीचे पैसे मिळाले त्यातलें थोडे आपल्या एकुलत्या एक मुलीसाठी दिले, त्याचं पैशातून सुधीरने हा शहापूरला बैठया चाळीतला रुम घेतला. पैसे सास-यांना परत करायची काही जरुरी नव्हती, पण भाडयाचे डिपॉजिटचे पैसे बॅकेत ठेवून त्यांच्या व्याजावर आणि भाडयांच्या येणा-या पैशातून थोडे थोडे करत तो परत देणार होता पण आता या चाळीतल्या रुमला वर्ष होत आलं पण कोणी भाडोत्री टिकतच नव्हता, कारण काय तर? तिथं त्या रुममध्ये राहणा-या लोकांना खूप वाईट अनुभव आले होतें, अनुभव म्हणजे काय तर…….म्हणजे शेजार वैगेरे संगळ चागलं पण…..

*************************

पहिले भाडोत्री होत रुकशे कुटूंब, दोघं नवरा-बायको आणि एक-दीड वर्षाची मुलगी. नवरा तिथं जवळच्या एमआयडीसीमध्ये झाडूसफाईचं काम करायचा, तिथं त्यांच्या बायकोला घरात आल्या दिवसापासून घरात ठिकठिकाणी पुडीत बांधून ठेवलेले अंगारे, उदीने भरलेल्या डब्या भेटल्या होत्या, आजूबाजूला शेजा-या-पाज-याशीं चौकशी केली तेव्हा कळालं की ही रुम एका बाईची होती, तिला देव-देवस्कीचा प्रंचड नाद होता… तिचा नवरा गेला सोडून तिला… तो का, कधी गेला याविषयीं कुणासं ठाऊकच नाही, कारण तीने कधीच कुणाला काही सांगितलं नव्हतं, इतक्या वर्षाच्या काळात तो कधी पुन्हा आलाच नाही, मग ती एकटीच राहायची, कपाळावर कुंक आणि गळ्यात मंगळसूत्र घालायची, कुणी विचारायची सोय नव्हती. सरळ खेसकायची, तिला मुलंबाळ काही नव्हतं. घरकाम करुन कमवायची आणि जसं वय झालं तसं काम झपायचं नाही…. मग काय….. घरात एकाला भाडोत्री म्हणून ठेवला, हा भाडोत्री सुतारकाम करायचा, यांच्या दोन्ही मुला-मुलींची लग्न झालेली, पण आता शांत बसायच्या काळात शहरात अजूनही पैसे कमवण्यासाठी ही अशी काम करायचा, आता इथं शहापूरला नवीन टाऊनशीपचं काम सुरु झालयं तेव्हा तिथं त्याला फर्नीचरचं भरपूर काम भेटलं होतं. तर त्याचं पुढे झालं असं…..की तो कमवायचा, मालमसाला विकत आणायचा…..ती जेवण बनवायची…… दोघाचं व्यवस्थित चाललं होतं, तुमच्या डोक्यात आलं असेल काही तरी सुरु होईल पण इथं वासनेला जरा सुदधा थारा नव्हता, दोघंही आपआपल्या लक्ष्मणरेषेत होते, अचानक एक दिवस तिची तब्येत बिघडली…… नाही वाचली बिचारी….. मग काय त्या तिथं तिच्या सोबतच राहणा-या त्या सुतारकाम करणा-या भाडोत्रीने ती खोली स्वतःच्या नावावर करुन घेतली….. त्यातचं त्याचं तिथंल टाऊनशिपमधलं काम थांबलं…. सरकारीखात्यानं ती टाऊनशिप वनजमीनवर बांधल्यामुळे रोखून धरली…. काम संपल….. तो परत आपल्या गावला निघून गेला….. तो आता नातवंडाच्या गोतवळ्यात रमला…. शहापूरला येणं-जाणं कमी झालं….. तो ही आता तिथं सलग राहत नसे आणि एक दिवस कुण्या सुधीर नावाच्या माणसाला विकुन टाकली रुम त्यानें….. आजूबाजूची लोक सांगत होते की ती जी बाई होती…… ती अचानक आजारी नव्हती पडली तिला आजारी पाडलं गेलं….. त्या तिथं तिच्यासोबत राहणा-या माणसांनेच काहीतरी केलं, त्यांने तिचं बारावं, तेरावं, अंतिम संस्कार, काहीही केलं नाही, तिच्या आत्म्याला शांती अशी काही भेटलीच नसणारं…म्हणून ती इथंच या घरात वास करत असणारं…..आजूबाजूचे काहीबाही बरळयाचे….सुधीरने या असल्या गोष्टीचीं चौकशी केली नव्हती रुम खरेदी करण्याअगोदर…. 

*************************

त्या रुकशेची लहान मुलगी त्या घरात पाऊल टाकल्यापासून नुसतीच आजारी पडली होती, दिवस-रात्र नुसती रडत बसायची, दोन-तीनवेळा जवळच्या दवाखान्यात दाखवून आणली……. पण फरक पडत नव्हता…….  त्या मुलींच्या अश्या बिघडलेल्या तब्यतीपायी त्या रुकशेची बायको हवालदिल झाली, रात्रीची जागरणं वाढली…… सतत औषधाच्या बाटल्या-गोळ्या यांनी अंथरुणापासची जागा भरुन जाई…. कधीकधी एकदमच मध्यरात्री डोळा लागायचा….. त्यातूनही काहीतरी एकदमच धक्का देणारं स्वप्न पडायचं आणि दणकून डोळे उघडायचें….. काहीतरी झ-याचं पाणी वैगेर दिसायचं….. नुसताच खळखळाट ऐकू यायचा आणि दुस-याचं क्षणाला गळा घोटणारी किंकाळी ऐकू यायची…. कान बंद करुन घेतले तरी आवाज ऐकू यायचे स्वप्नात… डोळे उघडायचे आणि मग कुठेच काही नाही….सगळचं शांत भकास…..मग घरातल्या लाईटी चालू ठेवून झोपायचीं…. मानसिक त्रास वाढतच चालला… नवरा सकाळी उठून कामाला जायचा….पण बायकोची स्थिती ढासळत चालली आणि त्या लहान मुलीचीं अबाळ सुरु झाली…. आजूबाजूचे लोकं काही बाही सांगायचे… म्हणायचे तुमच्या लहान मुलालां तीच बाई त्रास देत असणारं….. तिला मुलंबाळ नव्हतं ना म्हणून….. दवाखानातल्या औषधांनी काही फरक पडत नव्हता… ताप वाढतच गेला त्या लहान पोरीचां…. गोरीपान गोजिरी दिसणारी ती पोरं पार चेहरा उतरवून काळीनिळी पडली होती….. पारच वाळत चालेली….. एकदम निस्तेज दिसायची आणि नुसती आसवं गाळत बसायची तिची आई…. तीन महिने निघून गेले….ती लहान मुलगी वारली… तिला गोवर झालं होतं….. त्या मेलेल्या बाईच्या त्या घरात असण्याच्या खूणा अधिकच गडद झाल्या…. आणि काय ?….. त्या नव-या-बायकोनीं शहापूरच सोडलं… सुधीरकडे डिपोजिट मागायला ही ते आले नाहीत…. त्यांना आपलं सगळचं गमवल्याचं दुःख होतं…. सुधीरने मग थोडया दिवसांनी त्याचे भाडयांचे तेवढे पैसे कापून बाकीचे पैसे परत केले….घराला टाळा लागला…  

*************************

पाहिल्या भाडोत्रीच्या अश्या अनुभवानंतर आजूबाजूचे शेजारी हरप्रकारे समजावयचा प्रयत्न करायचे. सांगायचे “काहीतरी करुन घ्या वास्तूचं…. किमान साधी पूजा तरी घाला….. अहो इथं त्या मेलेल्या बाईनेच त्या मुलीला मारलयं…. तुम्ही विश्वास ठेवा अगर नको…..”, सुधीरच्या मनाची असल्या गोष्टीं असतात हे मानायचीचं तयार नव्हती. मुंबईत एका प्राईव्हट कंपनीत असचं आपलं नऊ ते पाचवाल्या डयुटीचं काम करायचा….. तो मूळचा शरणपूरचा नाशिकचा……. न्हानाचा मोठा तिथंच झाला….. एकटाच पोरगा….. वडील हा पोटात असताना एका अपघातात वारले…..त्यांच्या मामांनी त्यांला पोसला….यांच्या जन्माअगोदर परिस्थिती खूप चांगली होती….हा जन्मला आणि ग्रह फिरले, साडेसाती सुरु झाली अशी सुधीरची आई म्हणते…..आई म्हणायची तुझ्या बापाच्या वाईट कर्माने ही दशा झाली….म्हातारी….. सुधीरची आई….. आता मरणाला टेकलीय……पण कधी आपल्या नव-याबदल चांगल असं बोलली नाही…..सुधीर मामाच्यां आधारावर शिकला…..सुधीरने जेव्हा लग्न केलं तेव्हापासून थोडे का होईना….. दिवस पलटायला सुरु झाले …..तरी देखील राहून-राहून वाटायचं…आपण कुणाचं वाईट करत नाही….चिंतत नाही…मग का बरं आपलं चांगल होतं नाही…..का कश्यात कसं यश मिळत नाही….सतत काही ना काही तरी कुरकुर चालू असते…..बायको म्हणायाची काहीतरी बाहेरचं बघा… म्हणजे… कुणी नजर तर लावत नाहीना….कुठंतरी अंगारा वैगेरे आणा….. असले विषय काढले म्हणजे सुधीर समोरच्याला वेडयात काढायचा…. विषय हटकून दयायचा…. तो म्हणायचा असलं यांच्या डोक्यात येतचं कसं बरं? त्याला अशी सल्ले देणारी सगळीच माणसं काही अडाणी नव्हती ब-यापैकी शिकली-सवरलेली होती, त्यानें काही न ऐकता नवीन भाडोत्री शोधायला सुरवात केली, बहुतेकवेळा कुणी ना कुणी भेटे पण तिथल्या शेजा-यापाज-यांशी चौकशीअंती कुणीही तयार होत नसे….. पण मग एकजण तयार झाला, म्हणजे ते एक नव्हते चौघाजणांचा ग्रुप होता, त्यांतला तो तिसरा होता…. त्यांनेच सगळे भाडयांच्या करारनामेचे सोपस्कार पार पाडले…. जवळच आसनगावला इंजिनिअर करणारी मुलं. तिकडे कॉलेजची हॉस्टेलची फी परवडत नव्हती आणि सध्या जागेची त्यांना निकड होती, सगळं फायनल झालं. त्या मुलांनी डिपॉइट दिलं, हळूहळू ती मुलं रुळली, त्यांनाही आजूबाजूच्या लोकांनी कहाण्या सांगितल्या…… त्या बाईच्या….. पण त्यांतल्या एकालाही ते काही रुचलं नाही…. हसायचे ते लोकांच्या सांगण्यावर …साधारण चार महिने गेले….तिथं ती चौघ तरुण पोरं……उफडया छातीच्या तरुणीचं पोस्टर काय…..मटण-मच्छी काय….. व्यसन वैगेर तर होतचं होती आठवडया-आठवडयाला…त्यातला एकजण आता गांजा ओढू लागला होता….त्याला ही सवय हल्लीच सुरु झाली…एकदम हडकुळा…..आज पहिल्यांदा त्यांने तिथं त्या खोलीत गांजा ओढला…त्या बंद खोलीत सगळीकडे धूर पसरला, त्याला प्रचंड हलक वाटत होतं, कसली तरी हाव होती आणि ती संपावायची पण होती आणि त्याचवेळी ती एन्जॉय पण करायची होती असाचं काहीतरी अनुभव……. हा तोच तिसरा… बाकीच्या तिघांना यात अजिबात रस नव्हता… तो गांज्याचा कडक वास त्यांना उबग आणत होता…. डोळे लकत आले….सगळे झोपले… सकाळ झाली… तो गांजा ओढणारा उठतच नव्हता… त्याला जास्त झाला गांजा का माहित नाही?…. पाच-सहावेळा उठवायचा प्रयत्न केला….शेवटी घाबरत तिंघानी नेला दवाखान्यात……पार आयसीयूत अडमिट केलं…… इकडे शेजा-यांनी चौकशी केली त्या तिंघाकडे….. नाईलाजाने त्यांना सांगाव लागलं की त्यांने गाजां ओढला म्हणून…आता मात्र त्या शेजा-यांचा काळजाचा ठोका चुकला…कायतरं….तो जो बाईकडे भाडोत्री होता ना हा तोच तो सुतारकाम करणारा….. तो देखील गांजा ओढायचा…. बाईने कदाचित त्याला ‘तो गांजा ओढतो त्या सुतारकामवाल्यासारखा’ म्हणूनच काहीतरी केलं असणारं….आता मात्र ते तिघे देखील घाबरले…जे व्हायचें ते झाले….बिचारा तो गांजा ओढणारा आता या दुनियेत नाही राहिला….मेला काही दिवसातच….रिपोर्टं आले…. त्यांचा अचानक बल्डप्रेशर हाय झाला होता…एक दोनदा त्या आयसीयूत जागं आली त्याला तेव्हा बरळला होता….. जिवंत बाई बघितली म्हणून…..जाऊदे च्यायाला मेला तो….लोक मागून काय पणं सांगत सुटतात

*************************

आता सुधीरला टेंशन आलं काय करावं….. विकावी का ही ब्याद…..? आणि सुटका करुन घ्यावी का…..? स्वतःच्या हटटापायी असे किती जणाचें जीव टांगणीला लावू दयायचे…..? यांचा अर्थ काय तर त्यांचा ही या गोंष्टीवर विश्वास बसू लागला होता….. खूपच वाईट गोष्ट घडली ही….त्यानें परस्थितीसमोर मानली…. हदयाच्या एका कोप-यात एक क्षण पुरेल इतकी जागा एका नकळत्या भितीनें घेतली, सुधीरने बायको-सास-यांशी सल्लामसलत केली आणि त्यांने निर्णय घेतला भटा-ब्राम्हाणला बोलवून एक वास्तूशांती आणि सत्यनारायणाची पूजा करायची….आणि त्या नंतर तिसरा भाडोत्री ठेवायचा….आणि त्यानंतर जर असं काही होत राहिलं तर मात्र खोली विकून टाकायची…. जशी पूजा आटोपली तशी दक्षिणा घेतल्यावर भट जावयास निघाला तितक्यात सुधीरने मनातला प्रश्न विचारला…. “आता काही होणार नाही ना”!. ”ते असे निश्चित सांगता येणे शक्य नाही आणि मुळात या बाईचें मूळ ठिकाण नाव गाव काहीचा पत्ता नाही…… त्यामुळे गोत्र, कुलदैवत कळणे मुश्कील… आता वास्तूशांती करुन किमान वास्तूपुरुषास समाधान पावेल इतपत प्रार्थना केलीय…. फळ येईल ही अपेक्षा…” भट जाताजाता बोलला.

या भटजीने एक नवीनच सुधीरच्या डोक्याला काम लावलं…. मेदूंत काहीतरी नवीन रसायन टाकल्यासारखं वाटतं होतं….…. काय तरं म्हणे…गाव कुठलं…मूळ कुठलं…या इथं चाळीत राहणारं एक जुनं जोडपं होतं, त्यांच्याशी बोलणी केली, त्यांनी हलक्या आवाजात काही माहिती सांगितली. थोडी ऐकीव, थोडी कधी कळत-नकळत डोळ्यांनी बघितलेली…काय तर म्हणे…ज्यांच्याबरोबर तरुणपणी या खोलीत बाई राहायची तो तिचा नवरा नव्हताच….त्या माणसानं हिला इथं ठेवून घेतलं होतं…हाैसे-मौजेसाठी….त्यांची फॅमिली राहायची पुण्याला….तो यायचा आठवडयातून एक-दोनदा…आला की सगळं संसाराचं सामान घेवून यायचा… कांदे, बटाटे, मालमसाला, चहा पावडर, बिस्कीटचे पुडे सगळं काही…तेव्हा बाई आंनदून जायची…शांत व्हायची…सगळ्या समाधानाच्या खुणा दिसायच्या…असं नेहमी व्हायचं…आजूबाजूच्या लोकांनाही आता कळालं होतं….कुणी विचारलं नवरा कुठयं गं तर म्हणयाची त्याचं सारखं बाहेरगावी काम असतं…..पण लोकचं ती… त्यांना कळल्याशिवाय थोडीच राहतयं…. की हा तिचा नवरा आहे की कुणी दुसरा… जास्तच कोणी विचारल्यावरं…..ती वरवरची उत्तर दयायची… मग लोकही जास्त चौकश्या करायच्या नाहीत पण तिच्यामागून तिच्याबदल सतत बोलतं मात्र बसायच्या…असं नेहमी व्हायचं….तिथल्या बायक्याच्या घोळक्यात बसली की मग बाईला मुलांबाळाचा प्रश्न विचारायच्या… काही-बाही कारण सांगून ती तिथूंन निघून घरात येवून दार लावून नुसतीच रडत बसायची….तो काय फक्त आठवडयाला येई…साडीचे पदर सटासट काढत….एका निझरत्या क्षणाला मोकळा होई…आणि पुढच्या क्षणाला पुन्हा सुरु होई….अशी बरीच….. नाही म्हटलं तरी किमान पाच सहा वर्ष लोटली…..आणि एका दिवशीपासून…..

*************************

साधारण पन्नास सालं मागे…….

पुण्यातली एक मुसळधार पाऊसांची सततंधार सुरु असलेली सकाळ. “बुधवार पेठ एक तिकीट” कंडक्टरला कमरेच्या बटव्यातून पाच आणे काढत त्या बाईने एसटीतली जवळची सीट पकडली….. पोटात एक नऊ महिन्याचं बाळ घेवून ती एसटीच्या महिलासाठी लिहिलेल्या सीटपाशी येऊन बसली, ती ओली छत्री तिथंच खाली पायाजवळ टाकून दिली….अख्खी साडी ओली होती….छत्रीचा काडीचाही उपयोग झाला नव्हता…..पूर्णपणे भिजल्यामुळे डोळ्यातून पडणा-या आसवांना काही वेगळंपण असं उरलचं नव्हतं….ती मागच्या सकाळपासून नुसतीच प्रवास करत सुटली होती….पार निपाणीवरुन आली होती…हल्ली आंदोलनाचा जोर होता….संयुक्त महाराष्ट्रात बेळगाव निपाणी येणारचं….विश्वास होता……तेच तिचं मूळ गावं…कोण बरं ही…तर ती जी मेली नां बाई तिची ही आई…निपाणीला तिचं माहेर…जवाहरलाल नेहरु तलावाजवळचं घरं….नवरा… त्याचं विचारु नका…त्यांच्या नावाचं कुकूं लावणं बंद केलयं तिने…तो बिजवर होता…खानदान मोठं म्हणून लग्न केलं….पण….त्यांच्याने काही होतचं नव्हतं….मग आता तुमच्या डोक्यात प्रश्न पडलायं बाई कुणाची…म्हणजे बाईचा बाप कोण? तर त्या अगोदर बाईच्या नव-याबदल…तो जो शहापूरला सतत यायंचा त्याच्याबदलं….अर्थात बाईला ठेवून घेतलेल्याबदल….

*************************

एका दिवशीपासून…..तो येणं बंद झालं….ती नेहमी त्याला विचारायची की, तू कुठूंन येतो… तुझ्या घरादाराबदल सांग….तो कधीच सांगायचा नाही…म्हणायचा मी इथं येतो ना न चुकता…मग नुसत्या बाकीच्या चौकश्या कशाला…ती ही मग विचारायची बंद व्हायची…आठवडयाभरानंतर भेटल्यामुळे एखादया भुकलेल्या वाघिणी सारखी तुटून पडायची…त्या दोन दिवसात…जेवणं फार कमी बनायची पण खाणं मात्र मजबूत व्हायचं….त्याचं तिच्यावर प्रेम होतं की नुसतचं वासना मिटवण्याचं साधन हे तोच जाणो…एक मात्र सांगतो…बाई मात्र आपलं सगळं जग तिच्यामध्ये पाहिलं…..आणि कुणी दुसरं नव्हतचं…..

तुमच्या डोक्यात आता हे येईल की सुधीर आणि या बाईचं काहीतरी संबध असेल तर तसं काही दुरदुरपर्यन्त काही संबध नाही….बरं सुधीरने तिसरा भाडोत्री ठेवला बरं का…..हो इथं तिघजण आहेत…दोन बहिणी एक भाऊ…सगळे कामाला जातात…रात्री कामावरुन जो कोण पहिला येईल तो जेवण बनवायला सुरवात करतो…जेवतात….लगेच अंथरुणावर पडल्या-पडल्या झोप लागते तिघांना…. ते डायरेक्ट उठतात सकाळी पाचच्या गजरासोबत….. आजूबाजूला कुण्या शेजा-यांशी बोलायला सवडच भेटत नाही….रविवार असतो तो घर साफ करण्यात, आठवडयाभराचा किराणामाल भरण्यात जातो…..कुण्या पाहुण्याकडे जाणं कुणी पाहुण्याने येणं….. राहिलेले कपडे धुण्यात जातो… सध्यातरी यांना काही विशेष अनुभव नाही….किती महिने झाले…तीन ना…पण मी सांगतो…जसे सहा महिने होतील म्हणजे बघा सहा महिने होण्यांच्या आत कोणतीतरी नसेल यां तिघापैकी….काय होईल काय विचारता…कोण मारणार…बाई मारणार…हो ती बाई त्या घरात आहे अजून…. तीचा आत्मा…. “तीच्या काही झालं नाही ना मनासारखं, तरं मग ठीक नाय बघा….” आज मुददामहून त्यांच्या घरात शेजारची बाई आली सांगायला…त्या तिघानी वरचेवर ऐकलं आणि हया कानाने ऐकून त्या कानाने सोडून दिलं….पण त्या तिघांपैकी एका बहिनीच्या एक वाक्य लक्षात राहिलं ते एकदमच तिच्या मनाला चिकटून राहिलं…..बाईला अंधारात दिवा चालू ठेवत अंगाई म्हणायची सवय होती…..ही सगळी आसपासची लोक आपाआपल्या मनाच्या कहाण्या सांगायच्या…काही गोष्टी खरचं होत्या….हो ती अंगाई म्हणायची….बाईला आई व्हायचं होतं….असतं एक-एकाचं जगणं…बिचारी बाई….

*************************

तर ती भिजलेली पोटुशी स्त्री छत्री पकडत पकडत जशी एसटी थांबली तशी बुधवार पेठेच्या एरियातल्या स्टॉपवर उतरली. पाऊस काही थांबायचा नाव घेत नव्हता…तांबोळी मशीदीच्या तिथं तो येणार होता….कोण…. तिचा यार…..त्यांने शब्द दिला होता…ती माहेरी एवढयासाठी गेली होती की काही दागदागिने भेटताता का म्हणून….. ते काही तिला जमले नाही….जवळजवळ पंधरा मिनिटानीं तो आला… हाच त्या मेलेल्या बाईचा बाप….तो घरदाजं होता….पुण्यातल्या पुढे नावाजलेल्या मतदारसंघाचा तो खासदार झाला…त्या अगोदर विमान उडवायचा…त्यानं उडवणं बंद केल की त्यांतून तो रिटायर झाला ते देव जाणे ?…. मग फुल टाईम राजकारणात आला… मग तर अजूनच उडायला लागला… हे सगळं भविष्य…. पण सध्या वर्तमानकाळात याने मोठा दगा दिला…त्या बाईच्या आईला…मजा मारली आणि केलं पोटुशी…तो तिकडं बंगळूरला विमान उडवायला शिकायला आलेला असताना हिच्याशी ओळख झाली…तोल सुटला…पोरगी झाली गरोदर…काही अडचण नव्हती…पण बाईच्या आईच्या बिजवर नव-याला आपली इमेज माहित होती…तो स्वतः असं काही देऊ शकणारं नव्हता…..हे असलं काही इथं आपल्या नावाला नको म्हणून त्या नंपुसकाने तिला घराबाहेर काढली….. माहेरी तिची उपेक्षा झाली…अजून काय मग…. या महाशयानीं पुण्याला बोलवली….घरी सांगितलं आई-वडीलांना…मग काहीतरी ठरलं…

बाईच्या आईला मारुन टाकण्यात आलं….दगा दिला…बाईच्या बापानं…पण त्या अगोदरचं तिनं ते बाळ तिथं त्या वेश्याच्या आवारातल्या गल्लीत टाकलं…. तिथल्या कांचननं ते मूलं उचलं….सांभाळ केला….पण तिला लहान वयातच या धंदयासाठी तयार केली…तिची माऊलीपणाची कूस कायमची नष्ट करुन टाकली…तिला मस्त सजवलं…पार एकवीसची होईपर्यन्त जपून ठेवली….आज तीचा सोदा झाला….मोठी रक्कम मोजली…जवळजवळ त्याकाळी एक लाख…तेव्हा बाईकडे अंग होतं…ती तरुण होती…हया माणसाने एवढें पैसे मोजले…कोण हा…..तर हा केशव रन्ताबें….कांदाचा मोठा व्यापारी….तर हयाचा बिझनेस सकाळी सात वाजल्यापासूनं रात्री बारा वाजल्यावरही चालू असायचा….नुसतं काम काम…यांतून आराम मिळावा म्हणून त्याने शहापूरला जागा घेत ही बाईची व्यवस्था केली……

*************************

बाईला वेळ लागला सावरायला, तीची ही काही स्वप्न होती बाकी मुलींसारखी….नाही होतं सगळ्याची स्वप्न साकार…काय बोलावं…तर हा केशव रन्ताबें..धुळ्यात पांझरा नदीच्या किना-यापाशीच्या ज्योती टॉकीजपाशीच्या बाजाराजवळ दुकान होतं…होलसेल कांदे विकायचा…बाहेर फिरणं होतं…घरी बायको होती… पाच वर्ष झाली…..नुसताच संसार चालला होता…वाढला काही नव्हता….व्यापार मात्र वाढला… मग सुख-शांतीचे अन्य मार्ग दिसून आले… पुण्याला एकदा जाणं झालं… मग बुधवार पेठेतल्या वेश्याकडे जाणं वाढलं…..मग कधीतरी गुप्तरोगाचं आजारपण चिकटलं….मग काही दिवस बंद झालं….तिकडे धुळ्यालाच खाजगी दवाखान्यात दवापाणी करत बरं झालं सगळं….पुन्हा काही दिवसांनी पुन्हा पुणं गाठलं…यावेळी असं एक प्रोपजल समोर आलं की, आणि ते स्विकारलं गेलं…पुणं बंद….आता डायरेक्ट शहापूर… बाईचं प्रकरण….कधीच संशय घेतला नाही घराच्यानीं….. की कुठं विश्वासघात होईल अशी खूण ठेवली….कधीच कुणाला याबदल सांगितलं नाही…तोंड जास्त उघडलं नाही….तर या केशव रन्ताबेंचा वाहन अपघातात…. बरोबर ओळखलतं…… केशव रन्ताबें देवाघरी गेला….बाईनें कधी चौकशी केली नाही….ती जिथं होती तिथंच राहली…आता सांगतो मघाशी मी म्हटलं की सुधीर आणि त्या बाईची काही संबध नाही तर मी मघाशी खोटं बोलत होतो…संबध आहे… नाही कळलं तर वाचा पुन्हा…का सुधीरचं पूर्ण नाव सांगू…..

*************************

गळफास लावून घेतला..आत्महत्या केली….काय झालं बरं ती मेली……लोकं म्हणतात बाईने जीव घेतला…त्या मुलीचा….मी म्हटलं नव्हतं सहा महिन्यात कोणीतरी मरेलं….ही तरुण पोरगी…जरा जास्तच घाईत होती….सगळं काही देऊन बसली होती…. कुणाला काय विचारता….एका मुलाला…. तिच्याशी लग्नाचं वचन देऊन तो आता दुस-या मुलीशी साखरपुडा करुन बसला…. त्यांने आई-वडीलाचां….घराण्याचां…..मान राखण्या-याचा पराक्रम केला….विशेषतः जातीचा….सांगतो त्याला सांगितलं होतं की कुणाचीही आणं पण सॅन्डीरक जातीची आणू नको….तुम्ही म्हणालं सॅन्डीरक ही कुठली जात….तर तुम्ही जी जात पकडलीयं त्यापेक्षा खालची…शेजारी म्हणायचे बाईचं हिच्या अंगात आली आणि फाशी लावून घेतली… सुधीरने वैतागून रुम विकली…एका कंपनीने विकत घेतली ती खोली……नुकसान झालं सुधीरला…आता तिथं कुणी राहत नाही….त्या बैठया चाळीत तो रुम गोडाऊन म्हणून वापरतात… कर्म-कर्म जे काय म्हणतात…तें हेच का…जे फिरुन फिरुन आपल्यापाशी येतं….

*************************

तर बाईला ठेवून घेतलेल्या माणसांच्या घरी त्यांच्या बायकोला सगळं ठाऊक होतं त्यांच बाहेर कुठेतरी लफडं आहे…..पण ते शहापूरला आहे हे कधीच माहित नव्हतं….

*************************

बाईला मारलं गेल होतं अगदी शांतपणे त्या सुतारकाम करणा-याकडून….बाईचा आत्मा, शांती, वास्तूपुरुष वैगेरे काही नव्हतं…नसतं…..तो जो बाईचा खरा बाप होता तो राजकारणी झाला पण कधीच यशस्वी झाला नाही…सतत यश भेटायचं पण टिकायचं नाही…रुद्राक्षाच्या माळ्या, माणिक-मोती सगळं घालून झालं…..कश्याचं तरी काहीतरी बाधतयं असं ज्योतिषीगुरुजीचं म्हणणं होतं….

*************************

शहापूरला ती खोली बाईच्याचं नावावर विकत घ्यायचा निर्णय त्या तिला ठेवून घेतलेल्या माणसाने केला…..त्यानं पहिलं बनवलेलं करारनामापत्र बदलायला लावलं…कागद फाडले गेले नव्हते….ते तसेच होते….बाई मेल्यावर त्या सुताराने ते कागद खोली विकण्यासाठी म्हणून बाहेर काढले….खोली विकत घेण्या-चे नाव काय…..सुधीर रन्ताबें…पण सुताराने मात्र कागद फाडले….जे गरजेचे होते तेवढेच ठेवले…फाडलेल्या पेपरवर काय बरं नाव होतं…. केशव रन्ताबें….कळलं तर कळेल तुम्हाला…नाहीतर पुढचं ऐका…त्या सुताराला तोंडाचा कॅन्सर झाला….तो सगळा शहापूरची खोली विकून आलेला पैसा आता रोज टाटा कॅन्सरच्या हॉस्पिटलमध्ये जाण्या-येण्यात, दवाखान्यात, औषध यामध्येच संपत चालला होता….च्यायला कर्म ही इतकी मादरचोद गोष्ट आहे का….ही फिलॉसाफी खरचं अस्तित्वात आहे की, नुसतचं एकामागोमाग एकमेकांत गुंतलेल्या गोष्टी….

  संपली गोष्ट

*************************

-लेखनवाला    

( All Copyrights with The writer . Permission from the writer is mandatory before  publishing the article or the part thereof . Not to be shared in quotes , or paragraphs . If shared online, must be shared in totality . )

Leave a comment