प्रतापगडाच्या पायथ्याशी……

प्रतापगड या अगोदर पाहिला नव्हता, फक्त छत्रपती शिवाजी महाराजाचां इतिहास वाचताना पुस्तकांत जे काही नजरेसमोर चित्र उभं राहायचं तेवढचं, याव्यतिरिक्त जे कोणी जाऊन आले त्यांच्याकडून प्रतापगडाबदल ऐकलं होतं, याशिवाय प्रतापगडाचा जो काही नेहमीचा फोटो वर्तमानपत्र व इतरत्र बघायला भेटायचा तेवढाचं….. मला असं दूर जायला आवडतं नाही…. प्रवास करायला वैताग येतो…… आणि असं शहरात राहून अश्या दूर ठिकाणी जायचं म्हणजे काही सलग सुटटया पकडूनच जावं लागतं, त्यात नुसतं प्रतापगड पाहणं नव्हतं त्याशिवाय महाबळेश्वर आणि नजकीचा परिसर पण आलाचं, सगळी योजना ठरली, तिथेचं महाबळेश्वरच्या परिसरातच गाव असलेलाच एकजण मित्र होता त्यामुळे बजेट जुळायला सोपं गेलं, एकूण सहाजण जाणार होतो, जानेवारीचा महिना, सलग सुटटया म्हणजे प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी तो आला शुक्रवारी, त्यानंतर शनिवार, रविवार. म्हणजे काहीएक तक्रार करण्यास वाव नव्हता, जाणार खाजगी चार चाकी गाडीतूनच, शिवाय गाडी चालवणाराच आम्हां सहाजणांपैकी एक, पहाटे सकाळी पाच वाजता लवकर निघायचा निर्णय झाला, मी पकडून तिघचं वेळेत पोचलेलो, माझ्या अपेक्षेप्रमाणे कोणीतरी उशीरा येणारं असं वाटत होतं आणि तेच झालं, बाकीचे दोघं आणखी एकाची वाट बघत त्यांच्या एरियात थांबले होते, तो रात्रपाळीवर गेला होता, त्यांला घेवूनच ते येणार होते, बर जो येणं बाकी होता त्यांच्याच गावी राहायची व्यवस्था केली असल्यामुळे त्यांच्या येण्याची वाट बघण्याशिवाय गत्यंतर नव्हता, आता सात वाजले तरी इथं शहरातच अजून हमरस्त्यावर बाकीच्यांच्या येण्याची वाट बघत आम्ही बसलो, त्यांच्यासोबत फोनवरुन संपर्कात होतो तोदेखील “आता पोचतो, थोडयावेळात येतो” असं करत करत सात वाजवले, अशावेळी हिरमोड होतो पण काही पर्याय नसतो, जवळ एक शाळा होती, तिकडं राष्ट्रीय सणांसंबधीचे जोरदार कार्यक्रम सुरु झाले, परेड सुरु झाली, राष्ट्रगान झालं, भाषण होत होती, कसरती होत होत्या, हे सगळं आम्ही शाळेच्या बाहेरच्या आवारात कठडयावरुन पाहत होतो, आमच्यातल्याच एकजण यांच शाळेत शिकलेला, तो सांगत होता कोण मुख्याध्यापक, कोण कुठल्या विषयाचें शिक्षक-शिक्षका शाळेत असताना शिकवयाचे, कोण वर्गशिक्षक, वर्गशिक्षका कोणत्या इयत्तेला शिकवायला होते ते…. एवढं सगळं सांगत असताना मध्येच म्हणाला “काय केलं एवढया वर्षात, इथंच तर आहेत….” बहुतेक त्याला शाळेबदल निराशा होती… तिथल्या कवायतीनां कॅमेरात कैद करण्याचे नव्याने उदयास आलेले सोपेस्कार पार पाडणं चालू होते…. आम्हीही केलं…. आता आठ वाजले… अजून आम्ही इथंच होतो… आणायला गेलेले दोघं येताना दिसले आणि फायनली तो आला….. साडेआठ वाजले…..एकाने आपल्यासोबत आणलेला नारळ गाडीसमोर फोडला…. प्रवास सुरु झाला… तो आता आपल्या लेट येण्याचं कारण सांगू लागला…. शिव्यांची लाखोली वाहण्याअगोदर आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न करत होता…. “अरे रात्रपाळीवर जाणार नव्हतो…. दुस-या एक जण आला नाही… नेहमी आठ तास करतो…. सकाळी पाचला घरी येतो…..पण आज अरे बारा तास करावे लागले…” आणि असं बरचं काही… पण सगळ्यांच्या शिव्यांपुढे हे संगळ ऐकायला येत नव्हतं.  

आयुष्यात फार कमी प्रवास केलेला मी या एकणूच प्रतापगड, महाबळेश्वरला जाण्याबदल प्रंचड उत्सुक होतो. शाळेत असताना, थंड हवेचं ठिकाण कोणतं? या प्रश्नाला उत्तर म्हणून लिहण्यापुरता आलेला महाबळेश्वरचा संबध आता प्रत्यक्ष अनुभवता येणार होता… पण एकूण सलग आलेली सुटटी कशी घालवायची? आणि ती ही नोकरी संभाळून याबदल जसा आपणं आपला विचार करतो तसा इतर लोक पण करतात आणि खूप सारी लोकं अश्या सलग सुटटयांच्यावेळी शहरातून बाहेर पडतात, साधारण पाच तासात सातारा गाठण्याचा प्रवास आज जरा जास्त तासाचां होणार हा अंदाज आधीपासून होता…. पनवेल क्रॉस केलं… इतकं काही ट्रफिक भेटलं नाही…. तो बिचारा रात्रपाळीवाला झोपून गेला… मी आणि बाकीचे मात्र जागे होतो… खिडकीतून इकडे-तिकडे पाहणं चालू होतं… याशिवाय गाणी चालू होतीच… चांगला मूड बनला….दुपार व्हायला लागली…. खंडाळा घाट सुरु झाला… कानाला थोडं वेगळं वाटू लागलं… असं जर तुम्हालाही या घाटात वाटत असेल तर तुम्ही निरोगी आहात… असा लोकांचा समज आहे… घाटावर शहरातून बाहेर पडलेली गर्दी जाणवू लागली होती…. ज्या एका मित्रासाठी हा प्रवास नियमित होता त्यांच म्हणणं पडलं की आपण सकाळी सहा वाजताच टाईमावर निघायला पाहिजे होतं…. पुढे सुदधा असचं थांबत थांबत जाणार बहुतेक….वाई पार केलं… वाटेत पुस्तकाचं गाव म्हणून ओळखलं जाणा-या गावाचा रस्ता दाखवला होता…. दुपारचे साडेतीन झाले….. पाचगणी…. आलं…. नगरपरिषदाचा फलक पार केला आणि तिथल्या एका पोलीसासारख्या वेषाधारी माणसानं रोखलं… टोल टाईप पावती फाडायला सांगत होता… गाडी इथली नाही…. आमच्यासोबत आलेल्याने त्यांला पैसे दयाला नकार दिला… म्हणाला मी इथला महाबळेश्वराचा लोकल माणूस आहे….आधार काढू का… त्यांच्या आधारवर गावचा पत्ता होता…. त्याला ते काढायची गरज लागली नाही…. पुन्हा रखडत रखडत प्रवास सुरु झाला…. खतरनाक ट्राफिक सुरु झालं…. त्यानंतर पुन्हा हाच प्रंसग महाबळेश्वरच्या हददीत सुरु झाला पुन्हा तसचं त्याने लोकल आहे सांगितल्यावर पुढे सोडलं…..वेणा लेक लागला रस्त्यात…. तिथंही तोबा गर्दी होती…. संध्याकाळचे साडेपाच झाले महाबळेश्वरला पोचायला… तिथल्याचं एका जवळच्या गावात मुक्कामाला होतो… पोचलो…. मेन महाबळेश्वरपासून साधारण नऊ किलोमीटर आतमध्ये…… गाडी एका ठिकाणी थांबली…. रस्त्याच्या उजव्या बाजूस घर…. डाव्या बाजूस काही एक अंतरावर सरळसोट जंगलाचा परिसर….. आणि त्याला लागून असलेली मोठी मोठी झाडं….. तिथं फक्त तेच एक घर बाकी काही दुसरं घर नाही….. एकदम शांत परिसर…. ज्या रस्त्याने आलो तो पुढे जाणारा सलग रस्ता….. मध्ये न थांबणारा… एखादं दुसरी गाडी जाताना दिसत होती….. बाजूलाच स्टॉबेरी लावलेली, समोर नुसतीचं मळाशेती…. दूर दूर वर दिसणारे डोंगर पलीकडे महाड वैगेरेचा परिसर असल्याचं इथला एकजण सांगत होता… प्रवासाचा अंदाज चुकला आणि दुपारच्या जेवणाची चवच निघून गेली, तरी एकदा वाटलं होतं अडीजपर्यंत महाबळेश्वर गाठून मस्त कुठल्यातरी हॉटेलात जेवू….. दुपारची जेवण झाली नव्हती पण आता भूक अशी राहली नव्हती….. जिथं उतरलो होतो तिथल्या लोकांनी पाहुणचार म्हणून कांदेपोहे खाऊ घातले, त्यां तिथं नवखेपण वाटत होतं… झोप हवी होती…..आणि ती झाली…. पुन्हा संध्याकाळी आठ वाजता उठलो…..जशी संध्याकाळ होऊ लागली तशी थंडी वाढू लागली, आमची स्वारी निघाली…. आम्हाला महाबळेश्वरचा बाजार अनुभवायचा होता, खूपच थंडी होती, दातावर दात आपटत होते….. अशावेळी जितके सिगरेटचे झुरके घ्यावेत तितके कमी, बाजार प्रजासत्ताकदिनाच्या मौहालात खूप सजवला होता, तिंरगी रंगाच्या छत्र्याची लक्ष वेधून घेणारी तोरणं अख्या बाजारात लावलेली होती, त्या बाजारातल्या एरियात काही नेहमी दिसणारी राजकीय शुभेच्छाची होर्डिग दिसत होती, पण शेवटी लक्ष वेधून घेतलचं, संभाजी भिडें याचं जावळी अरण्य ते रायरेश्वर लिहलेलं आणि त्यांचा तो हात छातीवर ठेवलेला फोटो असलेलं….. आणि लगेच झपाझप खूप काही आठवू लागलं…. हल्ली त्यांची प्रंचड चर्चा होती, शिवाय मिडियासाठी ते प्राइम टॉपिक बनले होते आणि आणखी एक बातमी होती की ते उदया की परवा प्रतापगडाला भेट देणारं आहेत….. मोठा कार्यक्रम होता….. याशिवाय ते सध्या ‘क्षेत्र महाबळेश्वर’ला मुक्कामी असणार होते तिथें नाक्यानाक्यावर याबाबत बोललं जातं होतं. संभाजी भिंडे हे नाव काही काळापुरता तुमच्या ओळखीचं नसणं साहजिक होतं किमान दोन हजार अठरापूर्वी….. पण जसं वर्ष सुरु झालं आणि पुढचं तर माहित असेल…पण तुम्ही या अगोदर ओळखत असाल तर काय म्हणून….सायकलवरुन एकटेच फिरणारे, गड-दुर्ग भेटी यासंबधीच्या योजना आखणारे, शिवाय बत्तीस मण सिंहासनाचा संकल्प करणारे आणि इतरही बरचं काही…..आणखी माहित असतील…. मिरज दंगल वैगेरे वैगेरे….. पण त्यांची ओळख ठळक सगळ्यांशी व्हायला दोन हजार अठराचं वर्ष उजडावं लागलं….


त्यांच्या अटकेची जोरदार मागणी होतीच, शिवाय राजकीय सत्तेची पार्श्वभूमी बघता तसं होणं कदापि शक्य नव्हतं आणि तसं झालं तर तो त्यांच्या राजकीय सत्तेचा पराभव असता त्यामुळे अशी त्यांची अटक होणं दुरापास्त होतं, कुणालाही आपली ठरलेली मत घालवायची नव्हती… गुरुजीनां त्या परिसरात मोठा जनाधार होता, जनशक्ती मोठयाप्रमाणावर पाठीशी होती आणि पुरावा तर नव्हताच त्यामुळे त्यांना असं अटक करणं सगळ्याच राजकीय पक्षांना कठीण होतं. मिडियांचा कळप अश्यावेळी जुगंलबंदी सुरु करुन बाजूला होतो, मूळ इथल्या जगण्याचे प्रश्न बाजूला पडतात……

मुळात वर्षाची सुरवातच महाराष्ट्रात दंगलीने झाली, निम्म्या लोकांना काय झालं हेच कळत नव्हतं, दंगलीचा उद्रेक बाकी ठिकाणी पसरु नये म्हणून काळजी घेतली जात होती. सामान्य लोक जी जीव मुठीत घेऊन सही सल्लामत निश्चितस्थळी पोहचण्यासाठी धडपडतात…..आणि जी या दंगलीसाठी जाळपोळीसाठी रस्त्यावर उतरतात ती पण सामान्यजन….


सामान्य लोक जी घरातून कामासाठी बाहेर पडत रेल्वेस्टेशन गाठतात, त्यांच्यासाठी तिथं स्टेशन परिसरात लागलेली राजकीय होर्डीग खूप काही सांगून जातात, कुण्या बडया नेत्याचा वाढदिवस, एखादी नवीन आलेली योजना, पूर्णत्वास नेलेला एखादा प्रकल्प यांसाठीच्या शुभेच्छा सारं काही दिसत राहतं, लॉटरी सेनेचा सरचिटणीस ते शांतता पुरस्कार मिळवलेली व्यक्ती या सा-यांना शुभेच्छा देणारी विविध संघटना, राजकीय पक्ष, वैयक्तिक अशे सगळ्याप्रकारचे बॅनर लागतात…. असचं एकेदिवशी दिसलं भीमा कोरेगाव येथे महार रेजेंमेटने पेशवाच्या केलेल्या पराभवास दोनशे वर्ष झाल्याच्या निमित्ताने तिथल्या विजयीस्तभांस भेट देण्यासाठी गाडयाची उपल्बधता… म्हटलं हे कायतरी वेगळं दिसतयं पण त्यांची उत्सुकता म्हणाल तर काही एक नव्हती, “हे असं काही सगळ्यासाठी थोडीचं आहे….ते त्यांच्या त्यांच्या लोकांसाठी असणार….” तो बॅनर वाचून तिथं असणा-या एकाची प्रतिक्रिया….. मी फक्त ऐकलं….. “एक तर एक तारखेला कोणी का जाईल पुण्याला आणि जाणारे जाऊन येतील….” अजून एक प्रतिक्रिया, पण मला सतत प्रश्न पडत होता की असं कधी झालं होतं का? मी शाळेत पाठ केलेला इतिहास आठवतं होतो पण काहीच आठवतं नव्हतं, आणि जास्त विचार करायला टाईम नव्हता…. लगेच ट्रेन पकडायच्या घाईत पण हे बॅनर वाचले जातात ….. राजकारणी आपलं भविष्य अंधारात दिसू लागलं की भूतकाळाचा आधार घेतात….कुठेतरी वाचलेलं वाक्य आठवलं…..


तर आमच्या या महाबळेश्वर भेटीचा पहिला दिवस निव्वळ बाजार फेरफटका करण्यात गेला…. दुसरा दिवस क्षेत्र महाबळेश्वर…. तिथंली ती प्रसिदध कुडं, मेन मेन पांईट बघण्याचं ठरलं पण जसं पुन्हा आम्ही रात्री राहत असलेल्या घरी परत आलो तसं समजलं की उदया गुरुजी श्रीक्षेत्र महाबळेश्वर मुक्कामी आहेत तेव्हा सकाळी तिकडं जाणं म्हणजे ट्राफिक मध्ये अडकण्यासारखं होतं. त्यामुळे उदया एका वेगळ्या ठिकाणी जायचं ठरलं ते म्हणजे तापोळा…. ज्या रस्त्यावर आम्ही राहण्यासाठी थांबलो तोच रस्ता थेट खाली तापोळयाला जाऊन थांबतो…. मग काय निघालो….. मध्ये अजून एक नजारा लागला, अक्षरशः डोळयात साठवून तेवढा कमी….. कोयना बॅक वॉटरचा हा परिसर….. इंथून उंचावरुन दिसणारा….नजारा. अहाहा… शब्द कमी पडावे असे…. त्या एका टोकावरुन खालचा देखावा एक नंबर….आणि यांचाच फायदा घेत एका बाईने तिथं मोठा थरमकॉलचा लव्ह तयार करत सेल्फी पांईट तयार केलाय, त्या लव्ह मध्ये बसून फोटो काढण्याचे दहा रुपये माणशी… चांगला बिझिनेस….काय बरं नाव त्या पांईटच…… शिवसागर पांईट…..कधी गेलात तर एकदा बघाच….. खाली तापोळा बघणं अजून बाकी होतं… कोयना धरणाचं पाणी आतल्या भागात आल्यामुळे इथं असं जलाशय तयार झाल्याचं सांगितल जात होतं… आता तापोळा पाहायची उत्सुकता होती…. समोर दिसत असलं तरी अजून पोचलो नव्हतो…. पोहचलो…. तिथं एकएकटयाला बोटीने फिरवणारे, संपूर्ण ग्रुपला बोटीने फिरवणारे….वेगवेगळ्या प्रकारची व्यवस्था होती…. तिथं त्या जलाशयाच्या काठाकाठानी काही ठिकाणं होती, एका ठराविक अंतरावर ठराविक वेळात घेऊन जाण्याचे वेगवेगळे रेट, यात एक जावळी अरण्य आणि कोयना परिसर यांची सैर…. पाच तासाची….. पण पैसे जास्त होते……पण पुन्हा कधीतरी नक्की प्लॅन करुन यायला हवं….. फेरफटका मारण्यासाठी उत्तम…. आम्ही आता सहा जणाचें सातशे रुपये देऊन जवळच्या एका ठिकाणी घेऊन जाणारी बोट निवडली…. या जलाशयातल्या पाण्याचा आणि आपला काही संबध आहे का ….तर आहे…. इथल्याच पाण्यावर बनणारी वीज आपल्या घरी येते…. शाळेतला ऊर्जारुपांतरणाचा धडा आठवला…. हे जग… जगणं…. हयाची गुंतागुतं तुम्हाला कुतहूल करण्यास भाग पाडते…. इथंल्या परिसरात राहणारा मित्र सांगत होता, उन्हाळात इथं याच पाण्याच्या पात्रात हे लोक समोर दिसणा-या गावाशीं किक्रेट टूर्नामेंट खेळतात… म्हणजे हे आता पाणी मार्चपर्यंतच…. तिथं सेल्फी सेल्फी चालू होतं… तिथं काही वेळ घालावला….. परत आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी आलो…. इथं महाबळेश्वरला येण्याचं आणखी एक कारण पॅराग्लायडिंग…. आधी नेटवर माहिती मिळवली… श्रीक्षेत्र उदयावर ढकल्यावर हे उंच उडण्याचं अगोदरपासून ठरलेलं प्लॅनिग पुढ आलं, पण मी काही उडणार नव्हतो कारण जास्तीचे पैसे नव्हते आणि असं उंच उडयाला आपली फाटते… पण बाकीचे जण एक्साईटमेंट मध्ये होते, पाचगणी टेबल पाईटं….. आशियातलं दुस-या क्रंमाकाचं उच्च ठिकाणावरचं मोठालं पठार…. काही पॅराशूट उडताना दिसत होती….. पण जसें तिथं पोचलो… तिथं असलेल्या एकाला विचारलं तो म्हणाला आज पॅराशूट उडणार नाही हवेचा दाब स्थिर नाहीय म्हणून, ज्याला उडयाचं होतं तो हिरमुसला मला मात्र बरं वाटलं, ते पठार हा एक अनुभव होता… एक तर इतक्या उंचावर एवढा मोठा सहा किलोमीटरचा मोकळा भूभाग….. समोर वाईचा परिसर….. पण कुठलेही तंटबंदी नसलेला हा भाग… आत्महत्या करायला मोकळीक देणारा…. मनात तसं काही नसताना उगाच येऊन गेलं….त्यात घोडेस्वारी वैगरेची मागणी होतच होती….इथंही जागा जागा शोधून लोक सेल्फी काढतं होते….

इतकं काही आपल्याकडे असताना आपण हे संगळ त्याला चांगल आकार देऊन जगासमोर का आणत नाही….म्हणजे काय करायला पाहिजे…..काही नाही…. सौदयशास्त्राचा भाग आहे… जाऊ दें…..या इथं बघा….. समोर खालची गाव दिसत होती…. संगळ शांत दिसणार…. पण खूप काही उलथापालथ नजरेस न पडणारी….. जितक्या उंचावर जाऊन पाहावं तितकं लोभसवाणं फसवं चित्र समोर येणारं…. काहीही होऊ शकत…. तिथं मूड बनत चालला होता… जावसचं वाटत नव्हतं….. पण वरती काही पॅरेशूट उडत होती त्याचं काय….नंतर कळालं ते सराव करतायतं…. त्यांची एक स्पर्धा होणारं होती…..  पुढच्या महिन्यात …… त्यांचीच तयारी चालू होती…. अश्या ठिकाणी येवूनही किक्रेट सुटत नाही, इंडिया आणि साऊथ अफ्रिकेची मॅच होती… टेस्ट मॅच…. मॅच हरणार बहुतेक आपण… तुम्ही जेव्हा काही ध्येय नसलेलं आयुष्य जगत असता तेव्हा क्रिक्रेटचे सामने तुमची सोबत करतात… कुठतरी काहीतरी होत असताना आणि तुम्ही त्यांचे भाग असल्यांचा फील देत राहतातं.. त्यांच्या जिकंण्याचा तुम्ही भाग असता… त्यांच्या जिकण्यांने तुम्हचा मूड बनतो… त्यांच यश तुमचं बनतं…. आता वापस आम्ही महाबळेश्वर परिसरात आलो… संध्याकाळ वाढत चालली… खूप सा-या एसटी गाडया सलग सुटयापायी महाबळेश्वरला येताना दिसत होत्या, आता महाबळेश्वर फुल झाल्याच्या वार्ता होत्या, इथं एक गोष्ट सतत दिसत होती… सगळीकडे एकच बोर्ड लावलेलें ते म्हणजे मॉपरोचे…. स्टॉबेरीचा मोठा ब्रॅन्ड….. स्टॉबेरीचं मोठं दुकान होतं… स्टॉबेरीची चॉकलेट, रस, जॅम आणि अजून बरंच काही विकायला ठेवलं होतं…. जिथं हे सगळं बनवलं जात, ते बनवणारे कामगार, त्याचं होणारं पॅकेजिगं हे ही दिसेल अश्याप्रकारे खास ठेवलं होतं….. काचेच्या भितींपलीकडे…. मुददामहून व्यवसायतली पारदर्शकता दाखवण्यासाठी केलं असेल कदाचित… त्या दुकानात एका ठिकाणी फुकटमध्ये वेगवेगळ्या चवीचे रस टेस्ट करायला देत होतें….. जास्त गर्दी तिथंच होती….. ब-यापैकी खरेदी झाली…. रात्रीचं जेवण ही बाहेरचं हॉटेलमध्ये होतं… तिथल्या टीव्हीवर मॅच बघत होतो, सलग सुटयामुळें हॉटेल फुल जोश्यात होती… जी मॅच इंडिया हरण्याच्या अवस्थेत वाटत होती ती आता जिकंली आपण… असं जिकंल्यावर वातावरण एकदमच वेगळं वाटू लागतं… थोडासा ताजेपणा जाणवतो… माझ्या मांसाहारी खाण्यावर वर्षानुवर्ष चालत आलेल्या प्रथा, पंरापंरा पाळताना आलेल्या अंकुशामुळे शाकाहारीच जेवावं लागायचं, ते इथंही चालू होतं आणि आता सवय नसल्यामुळे मांसाहारी खाणं होणार देखील नाही…. रात्रीचे अकरा वाजले… थंडी तशीच कुडकुडण्यालायक… आता महाबळेश्वरच्या आतल्या रस्त्याला आलो… तिथं एक मशीद होती…..खूप सारी माणसं न संपणा-याच्या संख्येने तिथून बाहेर पडत होती….तिथं पुन्हा ते ट्रफिक अनुभवलं….शुक्रवार होता…. काळोख गडद…. वरती आकाशात पण तेवढाच काळंभोर…कान गार होतं येईल ऐवढी थंडी….आणि त्यात एकजात स्मशानशांतता… मुबंईच्या धकाधकीत वरचं आकाशातलं अवकाश सावकाशपणे बघायचंच राहून जातं… ते तारे, ग्रह संगळ नवीन वाटू लागतं… आपण काय जगतोय, हे जगणं आहे का? सगळं सगळं आठवू लागतं.. तो ध्रुव तारा आठवतो…. त्याचं ते अढळ असणं…..मी असाच वरती त्या एकाच लुकलुकणा-या ग्रहाकडे बघायचा प्रयत्न करतोय… काही दिवसापूर्वींच नेहरु तांरागणला जाऊन आलो त्यांचीच सतत आठवण येत होती…. ही रात्र… अशीच न संपणारी असावी वाटत होती… माणसांनी फुल झालेला मेन महाबळेश्वर आत गावात पर्यटकांना सामावून घेत होता…. दिवस संपला… आठवणी साठवण्याचं काम मेंदू सावकाश करत होता… जिथं मुक्काम होतो तिथं पोचलो…. रात्रीचा एक वाजला… कधी एकदा अंथरुणावर पडतो असं वाटलं….


पण लगेच जाऊन झोपलो नाही….थांबलो थोडावेळ तिथल्या मधल्या रस्तावर…..तिथं रातकिडयाचां आवाज येत होता, बाकी सगळं शांत, फक्त एखादी गाडी खाली जाणारी आली की तेवढा काय तो आवाज…. अगदीच तुरकळ…. सगळं शांत, शहराकडयाच्या लगबगीचा इथें गंध नाही, कान शांत होते, खूप मन प्रसन्न होतं, इथल्या या अश्या रानोमाळात एक-एकाटयाने घर बाधंण्यामुळे आजूबाजूला माणसांच नंसण सुरवातीला अडचणीचं वाटत पण नंतर हळूहळू सवय होतें.


तिथं मग हळूहळू बाटल्या फोडायच्या…सारं जग विसरायला लावेल ऐवढी पियाची… संगळा जाणीवेतला इतिहास, भूगोल, वर्तमान विसरायला….. आणि नकोशी वाटणारी चालू परिस्थिती आणू पाहणारी अवस्था प्रदान करणारं कोण? म्हणजे…. दारु….मस्त….


आज रविवार शेवटचा दिवस, जिथं मुक्कामाला थांबलो होतो तिथूनं निघालो, आज श्रीक्षेत्र महाबळेश्वर करायचं, तसचं पुढे प्रतापगड बघत मुबंईच्या दिशेने निघायचं म्हणजे सोमवारी कामावर हजर… सगळं सामान कपडे गोळा करता-करता दुपार होतं आली, आता आम्ही निघालो, मी म्हणतं होतो आपण आता प्रतापगडला जाऊया मला त्यांचीच प्रंचड उत्सुकता होती…. पण बाक्याच्यांनी श्रीक्षेत्रचा आग्रह धरला. श्रीक्षेत्र महाबळेश्वरला सगळ्यात पहिली गाडी अडवली ती तिथल्या स्थानिक कर जमा करण्या-यानं, त्यानं गाडीतली माणसं मोजली, पुन्हा आम्ही “पण हा लोकल आहे काका इथला प्रोरपर” सांगण्या-या मित्राला पुढे केलं पण काही उपयोग नाही झाला….. दोनशे पंच्च्याहत्तर दयायला सांगितले, देण्याशिवाय दुसरं काय करणारं? पैसे दिले, त्यांनी पावत्या दिल्या, स्वच्छता कर, अजून हयावर टॅक्स त्यावर टॅक्स….. अजून अनेक कर लिहले होते…. रस्त्यात धारकरी मंडळी दिसली… हातात काठी, पाठीवर बॅग असणारी ही तरुण मुलं…. त्यांचा तो जमाव समोरच्या बाजूने रस्ता ओलाडतं होता, या इथल्या संभाजी भिडेंच्या सगळ्या गोष्टींना आता मिडियाची झालर होती…. बंदोबस्तात असलेल्या वाहतूक पोलीसांनी आमची गाडी अडवली, गाडीत जास्ती माणसं आहेत असं सांगून पावती फाडायला सांगत होता, त्याला कसंबसं समजावलं, तो ही घाईत होता, जा म्हणाला. पाच नदयाचा उगम स्थान असलेलं पंचगंगा मंदिर, गोमुखातून होणारं पाण्याचं प्रस्थान, प्रत्येक नदीच्या उगमस्थानापाशी लिहलेलं त्याचं नाव. जलकुंड. लोक त्या जलकुंडापाशीचं गोमुखातलं पाणी आणलेल्या बॉटलीमध्ये भरुन घेत होते, याशिवाय ओटी, नारळ यांचा छोटीखानी बाजार बाजूलाच होता, काहीजणं ओटया भरण्यात गुंग होते, पण प्रसाधनगृहाच्या नावाने प्रंचड बोंबाबोंब…. तिन्हीच्या तिन्ही संडास पार घाणीने भरुन गेलेले, नुसत्या लघवीसाठी ही प्रंचड गैरसोय, बायकासांठीची व्यवस्था कुठे होती देव जाणे…. इतक्या पवित्र ठिकाणी ही अशी स्वच्छेतेची परवड… मला आता मघाशी ‘कर’ म्हणून घेतलेल्या पैशाची चीड येत होती. मिडियाची पावलं इकडं कधी वळणार कळत नाही…. इथलं दर्शन झालं……

अजून एका ठिकाणी जायचं ठरलं, तिथं पुढे काही अंतरावर असलेललं कृष्णाबाई मंदिर हे शंकराचं मंदिर…. तिथं ही जलकुंड…. तिथं त्या मंदिरासमोरुन दिसणारं दृश्य…. डोळ्यात साठवून ठेवण्याजोगं…..तुम्हाला जर स्वप्न पडत असतीलं आणि त्यात जर दोन डोंगर आणि बाजूचा परिसर यांसारख असेल तर त्यांची खरी जागा हीच….इतकं हुबेहूब…. नेहमी शाळेत असताना निर्सगचित्र काढायला सांगितल्यावर दोन डोगंर तिथूंन उगम पावणारी नदी आणि त्या डोंगरच्या मधून उगवणारा सूर्य….परफेक्ट….जागा… इथं एकदा का एखादा फोटोग्राफर आला की तो हलणारच नाही पुढचा तासभर तरी…. इतकं काही आहे या जागेमध्ये…. तिथं काही धारकरी बसलेले होते…. मला त्याच्याबदल प्रंचड कुतूहल होतं…. तिथंच काही अंतरावर स्ट्रॉबेरीची शेती होती…. विकायला ठेवलेली स्ट्रॉबेरी वेगळ्या स्टॉलवर लावली होती… “कितीला किलो ?” म्हणून एक दोन उचलायच्या आणि घालायच्या तोंडात, आम्ही तसचं केलं….


सगळ्यात पहिल्यादा आधी सगळा इतिहास वाचून काढायचा, त्यातला कुठला विचार आपल्याला पटतोय तो ठरवायचा, एकदा का ठरला, की त्यानुसार त्या त्या तत्वाने वागायला सुरवात करायची, ते फार कठीण काम. ते करायचं, त्यात आदर्श बनवायचें…. हळू हळू आपले अनुयायी वाढवायचे. आपला विचार ठासून मनात भरतील, आजूबाजूच्या लोकांच्या मनात बिंबवतील इतपत स्फूर्ती त्यांच्यात आणयाची, आणि मग त्यानुसार अख्ख्या जगाने चालवं म्हणून जे कोणी आपलं म्हणणं ऐकणार नाही त्याला तुडवायचयं, त्यांना विचार करुच दयायचा नाही, आम्हीच अख्खं जग वाचून काढलयं, आता आम्हाला ठरवू दया, आमच्याप्रमाणेच ही दुनिया यापुढे चालले त्यातच सगळ्याचं भलं आहे असं म्हणणारी हीच ती जमात, हाताला काम नसताना, कोणीही योग्य मार्गदर्शक नसताना, रोजगाराचे रस्ते फारच तोकडे असताना तयार होणारा नवजमाव काहीतरी नवीन आजमावू पाहत आणि काहीतरी नवीन आहे म्हणून जे समोर मांडल जातयं त्यांची घोकपटटी सुरु करतो. नाही समजत सुरुवातीला मग, हळू हळू एक दोन शहाणे अनुयायी चेले बनतात, बाकीची मेढंरव्यवस्था करायला यामुळे सोपं जात. पण त्या नवजमावाचं काय, त्यांना स्वप्न अंकाक्षा सारं काही असताना त्यांना इतिहासात सोडून तिथल्या सारखं वागायला सांगत तेव्हाचे विरोधक आजही जिंवत असल्याचं सांगत त्यांच्याशी झगडा करण्यास प्रवृत्त करत समाज ढवळून काढायचा, जो कोणी आपल्या विरोधात बोलेलं, त्यांच नामोनिशाण मिटवायचं. राजकारणी यांचा वापर अत्यंत शांत डोक्याने, त्या आजकाल चेस खेळणा-या टूरनामेंटमध्ये पुढच्या चालीचा अंदाज अगोदर घ्यायच्या हिशोबाने कॉम्पुटरवर अगोदरच खेळी करुन बघतात…तसं इथं नफा-तोटा तपासत केला जातो…त्याप्रमाणे भूमिका घेतल्या जातात…. त्या बदल्या जातात.


आता उत्सुकता होती प्रतापगडाची, महाबळेश्वर सोडलं…आबेंनळी घाट सुरु….सतत नागमोडी वळण, इथं चालक अनुभव असलेला हवा नाहीतर धोका आहे….सतत अलर्ट राहवं लागतं…..एका बाजूला प्रंचड दरी… मोबाईलवर गाडीचा गेम खेळताना पण एवढे भारी ग्राफिक वापरणार नाही तेवढी खतरनाक वळणावळणाची वाट….. जरा कुठं वळण चुकलं ही थेट खाली दरीत कोसळणार… रस्त्यात मन बधवयला माकड होतीच…. भयानक रस्ता… रत्नागिरीवरुन महाबळेश्वर गाठायला जो लागतो तो हाच रस्ता…. पुढे काही महिन्यानंतर इंथचं एका भीषण अपघातात दरीत बस कोसळली आणि एकच माणूस जिंवत राहिला होता तो…तो हाच रस्ता.. तर तेव्हा असं वाटत होतं कधी गाठतोय प्रतापगड… अंदाज होता…. संध्याकाळ होणार साडेचार वाजतील…. आणि वाजलेच….

प्रतापगडाच्या पायथ्याशी गाडी लावण्यासाठी चांगली सोय केली होती, खूप सा-या एसटी महामंडळाच्या गाडया लागल्या होत्या, सहलीसाठी आलेली मुलं जास्ती दिसत होती. पायथ्याशी भगवा झेंडा झळकत होता, खूप भूक लागली होती…. तिथल्या त्या हॉटेलात मग साध्या डोश्याची आर्डर दिली, तिथला मालक कोणतातरी जुना मराठी पिक्चर पाहण्यात दंग होता, डोश्याला अजिबात चव नव्हती, तिथला एक माणूस संभाजी गुरुजीच्या झालेल्या सोहळ्याची बातमी मोठया अभिमानाने सांगत होता, “पाय ठेवायला जागा नव्हती, हे धारकरी…हा जमाव….” तीन लाखांच्या आसपास पब्लिक आल्याच्या बातम्या होत्या, आज तितकीशी गर्दी नव्हती, तिथला तो डोसा अर्धवट संपवत आम्ही हळूहळू चालत प्रतापगडाच्या दिशेने निघालो, इतके दिवस ऐकून होतो, आज प्रत्यक्ष गड पाहणार यांची प्रचंड उत्सुकता होती…. एकाएका पायरीमध्ये बरचं अंतर होतं, थोडसं आतमध्ये शिरल्यावर गडाचं नव्याने चालू असलेल्या बांधकामाविषयी कळालं, तशे फलक लावले होते, पाठीवरुन माल वाहणारी गाढव दिसत होती, सगळीकडें सिमेंटचा खच दिसत होता, काही दगड नव्याने लावले आहेत हे सहज दिसून येत होतं, समोर वळलो आणि गड किती मोठा आहे हयाची प्रचिती आली, लोक अजून वर वर चढत होते, आम्ही पण उत्सुकतेपोटी चढत होतो….माकड इथं कडे कडेला होती….तसचं पार वरती एक मंदिर दिसत होतं…. तिथपर्यंत गेलो तर परत खाली यायला उशीर होईल त्यामुळे जितकं समोर दिसत होतं तितकंच बघून निघायचं ठरलं, इथं माकडं पाठ सोडत नव्हती, ती सेवेला असल्यासारखी पाठीमागून फिरताना दिसत होती, तिथला अजून एक छोटासा हिस्सा आम्ही कव्हर केला, आमच्यासोबत असलेल्या एकाजणाने या अगोदर प्रतापगड पाहिला असल्याने तो या ठिकाण्याला आता मागच्यावेळेशी कपेंर करत होता, तो सांगत होता की पाच वर्ष झाली पण काहीचं सुधारणा दिसत नाही गडावर, तेवढयात तिथं असलेला अजून एक बोला मी तर दरवर्षी येतो, तो पण सगळं उदासवाणंच बोलत होता, मी मात्र ही सगळी इतिहासाबदलची जी काही साठवणूक दिसत होती ती अधाशासारखी साठवून घेतं होतो, अजून चालत चालत वर गेलो, बघितलं तर जशी डोंगरावरच्या झोपडपटटीत जशी घर असतात दाटीवाटीने, तशी इथं पण होती, प्रतापगडावर लोक राहतात, काही घरावर डिश एटेना दिसला, हयाची मी कल्पनाच केली नव्हती, तिथ एका ठिकाणी खाण्याची चांगलीच व्यवस्था दिसली, वरती अजून चालत गेलो आणि तिथं शिवाजी महाराजाच्या विषयीची पुस्तक विकणारी, मोठमोठाली फ्रेम विकणारी, टी शर्ट यांची छोटी छोटी स्टॉल दिसली, त्यानंतर अजून वरती गेलो तिथ एक बागेसारखा परिसर दिसला तिथं एक मोठाला स्तभंलेख दिसला त्याचं उदघाटन नेहरुच्या हस्ते झाल्याचं लिहलं होतं, तिथं ही खूप माकड होती, तिथचं एक गाईड होता, तो तिथं एका समूहाला इथल्या खूप सा-या गोष्टीची माहिती करुन देत होता, आणि आमच्यासारखे बरेच जण फुकटमध्ये ती माहिती ऐकत होते, तिथंच बाजूच्या तंटबंदीवरती चढलो, एकाबाजूला समोर सगळचं जंगल दिसत होतं, पण तिथंच खालच्या बाजूला डोकावलो तर प्लॅस्टिकच्या बॉटलचा खचच्या खच दिसत होता, तो गाईड आता त्या तटबंदीपाशी घेवून गेला, तिथली माहिती सांगत होता, शेवटी त्यानें शिवाजी महाराज की जय म्हटलं आणि मग सगळयानीचं जोरदार जयजयकार केला, तिथं एक देवीचं मंदिरसुदधा होतं, तिथं गेलो, त्याच कोप-यात आतमध्ये वस्तू विकण्याचं एक दुकानदेखील होतं, आम्ही इथं पण ती माहिती फुकटमध्ये ऐकत होतो, इथली मूर्ति, तलवारी, त्याचं मूळ स्थान वैगेरे वैगेरे गोष्टी सांगत होता, आता अश्या टप्प्यावर होतो जिथूनं नेहमी प्रतापगडाचं नेहमीच चित्र दिसत तो हा भाग ज्याला बुरुजं म्हणतातं हे नंतर कळालं, तिथलां तो भगवा झेंडा….. आपलं अस्तित्व, आपलं प्रेरणास्थान, आपला स्वाभिमान…..

अशी ठिकाणं लागतात नव्याने सगळं काही माडूं पाहण्यासाठी…. खरचं गड खूप मोठा होता आणि फकत दोन ते तीन तासात बघून तर अजिबात संपणार नव्हता, आपण एक दिवसच राखून ठेवायला पाहिजे होता, असं सारखं सारखं वाटत होतं, आता अजून एका त्या बाजूच्या एका तटबंदीवर आलो तिथं बसून खालचा नजरा खूपच भारी दिसत होता, त्या तटबंदीपाशी गेल्यावर खालच्या त्या पार्किंग केलेल्या चारचाकी बसगाडया एकदमच मुंगी एवढया दिसत होत्या, आम्ही तिथला तो भगवा झेंडा घेतला आणि सेल्फी काढत होतो, मन भरत तर नव्हतं, आता पुन्हा आलो की अख्खा गड पालथा घालू, फारच कमी वेळ भेटला बघायला…. “कमी वेळ भेटला” हीच गोष्टी खाली उतरताना चालली होती.


काहीचं गर्वहरण झाल्यासारखं होते, ‘केलं की नाही टिचून’ची भावना होती, त्याचांच बंदोबस्त करण्याचा प्लान असणारं. याशिवाय संभाजी महाराजचं मृत शरीर जोडत अंत्यविधी करण्याची एक बातमी होतीच…..


या शिवाय इथचं खालती कुठेतरी अफजलखानाची कबर असल्याची बातमी कानावर आली, इथचं जो इतिहास घडला छत्रपतीच्या आयुष्यातील महत्तवाच्या घटनांपैकी एक….इथंच तो महापुरुष काही शतकापूर्वी होता….खूप भारी फिंलिग येतं अश्यावेळी… पण पुन्हा तिथल्याच एका लादीची गडावरच्या मजबूत दगडाच्या पाय-याशी कमपेरजिन झालं, आपले राज्यकर्ते, आपली व्यवस्था, आणि आपण हे असे, यांची सततची गुंतागुंत नजरेस पडत होती, कश्याचा कश्याशी संबध आहे की नाही काही कळत नव्हतं. आलो एकदाचे खाली, पायथ्याशी, पुन्हा एकदा नंतर कधीतरी येण्यासाठी, प्रतापगड लक्षात राहिल एवढं मात्र नक्की….


त्या दिवशी डोकं दुखत होतं कामावर थोंड लेट निघालो, सकाळचे अकरा-साडेअकरा वाजले होते, सहज फेसबुक उघडलं त्यात एकजण पत्रकार जो समाजवाद, मार्क्सवादाचा पगडा असलेला…. एका मराठी पेपरमध्ये पत्रकार होता….. तो खूप वेगळं आणि भारी भारी पोस्ट टाकायचा…. मी त्याला आता काहीतरी वेगळं-भारी वाचायला भेटंत म्हणून फॉलो करायला सुरवात केली होती, आज त्यानें एक कंमेट टाकली ती संभाजी भिडेंबदल होती, काहीतरी लिहलं असेल वेगळं म्हणून मी वाचलं आणि लाईक देऊन पुढे स्क्रोल केलं, लिहलं होतं भिडें बहुजनाची माथी भडकवून आपला स्वार्थ चालवतात….यातला बहुजन म्हणजे काय हे माहित नाही की गुरुजीचां स्वार्थ काय ते ही माहित नाही….. चालत रेल्वेस्टेशनकडे आलो, काहीतरी राडा झाला होता, आजूबाजूची लोकं काहीतरी बोलत होती पण संदर्भ लागत नव्हता, असेल काहीतरी नेहमीचं म्हणून इगनोर केलं, मग एकदा कामावर पोचलो साधारण दुपारचे साडेबारा वाजले होते, ब्रेकिगं न्यूज येतं होत्या, पुण्यात या शूर स्तभांला वंदन करायला गेलेल्या लोंकावर काल दगडफेक झाली होती, फेसबुकवर बातमी पेक्षा त्यांच्याखालच्या कमेंट जास्त वाचत होतो, पण थेट काही कळत नव्हतं, आदल्यादिवशी तर सगळं ठीक पार पडल्याच्याचं बातम्या होत्या, मग आता हे असं काय….संध्याकाळपर्यंत प्रकरण निव्वळलं होतं….वाहतुक सुरळीत होती…. कामावरुन संध्याकाळी घरी आलो…..नेट चालू केला….ही न्यूज चॅनेल फ्री असतात नेटवर…. संध्याकाळच्या प्राईमटाईमला न्यूजचॅनेलच्या चर्चा-कार्यक्रम सतत सुरु होतें…. थोडं थोडं कळतं होतं… जी लोक स्तभं दर्शनासाठी गेले होते, त्यांना कसलीही सोय नसल्याचा एक व्हिडीओ समोर आला…. लोकांनी थाटलेली दुकान बंद दिसत होती… लोकं गैरसोयीची तक्रार त्या न्यूज रिपोर्टरला सांगत होतो… तो व्हिडीओ युटयूबला ट्रेडिंगला होता. आता या पाठीमागे असणारी नाव समोर येत होती. काही दिवसांपूर्वीचं ‘व्हू किल करकरे’ नावाचं पुस्तक वाचत असताना जे एक नाव त्या पुस्तकात होतं ते यां दंगली घडवण्या-या आरोपीमध्ये मुख्य आरोपी होते……. प्रत्येक गोष्टीचे इतके अर्थ मतितार्थ असतात का… गुंतागुंत इतक्या पातळीवर असते का…. नाही माहित….


तुम्ही आता तिथें असता जिथं अक्युचल न्यूज बनत असते तेव्हा तिथंली एक्साईटमेंट, भीती सगळं एकत्र असतं आणि ते अनुभवणं ही वेगळचं असतं, पोटात एक प्रकाराचा गोळा तयार होतो, आता काय होईल नि काय नाही असं वाटतं राहतं… तुम्हाला दगदग…तुम्हाच्या कुटंबूला दगदग…पण एक तुम्हाच्या आतमध्ये एक राक्षसी माणूस असतो ज्याला ही दंगल टीव्हीवर बघायला आवडते, त्याला घरात मस्त बसून हे संगळ ‘एन्जॉय’ करायला आवडतं, अश्यावेळी शिस्टीमला शिव्या घालयला, अंगुतक आलेल्या सुटीचा, उदया पण असचं बंद असणारं संगळ या फिलींगचा आंनद होत असतो, मेलेली माणसं आपली कोणी लागत नाही ना यांची खातरजमा झाली ना बास….


पुण्याच्या शनिवारवाडयात एल्गार परिषद आयोजित केली होती, हया परिषदेतील लोक स्वतः शिकली सवरलेली पण समाजाला न कळणारी भाषा बोलत आलेली, त्यात आता काही नवीन आवाज होते जे समाजाचं नेतृत्व करु पाहत होते, तिथं काही आधीच काही ठिकाणाचं वातावरण बदलून आलेले उमर खालीद, जिग्नेश मेवानी सारखे चेहेरे होते, जी जागा कधीकाळी पेशवाईच्या हुकमतीचं ठिकाणं होतं, तिथं आता कुणीतरी दुस-यानें येऊन म्हणजेच आपल्या विरोधतल्या विचाराच्या लोकांनी येऊन इथल्या सरकारनां ‘नवीन पेशवाई’ संबोधन खूपजणानां खूपत होतचं, काहीनां असं ‘यां’ना बोलू देणं म्हणजे ओसरी देण्यासारखं वाटतं असणं साहजिकच होतं, याशिवाय यात सहभागी झालेली खूप सारी मंडळी ही कुठल्याना कुठल्यातरी डाव्या संघटनेशी जुळलेली, त्यामुळे तिथं येऊन ते काय बोलणारं, कुण्याविषयी बोलणारं हे उघड होतचं, फक्त यामुळे वातावरण बिघडु नये अशीच आशा होती पण ती फोल ठरली, कुणाचा तरी राग कुणावर तरी निघणार होताच पण हकनाक या फंदात न पडणारा सामान्य माणूस मात्र बळी जाणार…. जातो…. आणि झालं ही असंच, हे नेते परगावी जाऊन मस्त प्रतिक्रिया देत बसतात, सामान्यानां यांच्या कुठल्याच गोष्टीत रस नसतो, आला दिवस जगणं माहित असलेल्या लोकांना असं इतिहासाच्या खोल खोल जात काहीतरी बाहेर काढत त्यांच्या आजच्या जगण्यात त्यांचे संदर्भ लावायला सांगायचे, हो कोण म्हणतं माणसाला प्रेरणा लागत नाही त्यांसाठीच तर बाबासाहेबांनी त्या धव्जस्तंभाचा आधार घेतला, आता त्याला दोनशे वर्ष झाली त्या घटनेला तर त्याचं जंगीपण येणं साहजिकच होतं…. प्रशासननं त्याचं ताकदीने ते करायला हवं होतं, मुळात तो ध्वजस्तभं उभारणाचां इतिहास काय तर …. भारतात व्यापारी म्हणून आलेले इंग्रज आपले पाय पसरवत होते, या इंग्रजाच्या फौजत आपले खूप सारे लोक सामील होतं, त्या अठराव्या शतकाच्या सुरवातीला पेशवाचं राज्य होतं ज्याला आपल्याच लोकांचे जातव्यवस्थेच्या विरोधाची किनार होतीच. तर या इंग्रजानी पुण्याला भीमा नदीच्या काठी पेशवाच्या विरोधात त्यांनी पाठवलेला प्रस्ताव स्वीकार न करता युदधाची ठिणगी टाकली, पेशवाचं सैन्य अमाप होतं, आणि इंग्रजाकडे त्या मानानं फारच तुटपुंज सैन्य….. त्या युदधात पेशवे हरले…. त्याचा वरदहुकूम हटला….. ही कुठेतरी त्या महार समाजासाठी त्यांच्या जाणिवेची स्पष्ट अशी खूणगाठ तयार झाली… त्या युदधात मरण पावलेल्या सैनिकांसाठी शिवाय त्या कामातून प्रेरणा भेटावी, आजूबाजूला यांची माहिती व्हावी या हेतूस्त इंग्रज अधिका-यानें तिथं शूरस्तंभ उभा केला, भारत स्वातंत्र्य झाल्यावर याला महार रेंजेमेंट असं नाव ठेवलं गेलं, डाँ. बाबासाहेब आंबेडकरानी या स्तंभाचाच आधार घेत एकूण समाजाचाची आपल्यातली आपल्या अस्तित्वाची जाणीव अधिक प्रखर करुन दाखवली, पुढे तर समाजातली मंडळी दरवर्षी जानेवरीच्या एक तारखेला त्या स्तंभाला भेट देतात. यंदाचं दोनशेवावं वर्ष त्यामुळे खास होतं, आजूबाजूला इतकी गर्दी असणं साहजिक होतं, तिथंल्या लोकांना रोजगार मिळाला असता, पण या येणा-या लोंकासाठी कोणतीच सोय न करण्याची तजवीज केली, यासाठी अर्थात कुठेतरी काय तरी योजना झालीच असेल की उदया लोक आली तरी स्टॅड लावू नका म्हणून….यासाठी काही डोकी कामाला लागली असतील ?… ती डोकं कुणा ची……?


प्रतापगडावरुन आता निघालो मुबंईच्या दिशेने संध्याकाळचे साडेसहा झाले, पोलादपूर मार्गाने गाडी निघणार होती, मध्येच माणगावं वैगेरेला थांबून जेवायचा विचार होता, गाडी सुरु झाली, हळूहळू पोलादपूर मागे सरलं, रोहा ही गेलं आणि मग खूप लाबच्यालांब रांगा दिसत होत्या गाडयाच्या….. त्या एकेरी रस्त्यावर सगळ्यानाचं सोमवारी कामावर जायची घाई दिसत होती, ठरल्याप्रमाणे माणगांवला जेवलो, नाही नाही म्हणता एक वाजला मुंबईत प्रवेश करायला, घरीपोचेंपर्यंत दोन वाजले, प्रतापगड, महाबळेश्वरच्या आजूबाजूचा परिसर त्या शांत अंधारात पुन्हा एकदा डोळयासमोरुन डोक्यात येतं होतं.


शिवाजी आणि स्वराज्य कितीतरी वेळ रेंगाळत होतं…. उदयापासून नव्याने आपल्या रोजच्या कामाला जायचं, आमचा शिवाजी आम्हाला सापंडतच नाही, आमचं स्वराज्य आम्हाला कळतचं नाही, नुसताच फुका अभिमान, त्या जाज्वल्य इतिहासात आमचं सध्याचं अस्तित्व कुठयं, संगळ संपलय आता, नाही उरलं तसलं काही, गरीबी श्रीमंती समजू शकतो, पण आपण नाडले जातोय, आपल्याला प्याद म्हणून खेळवलं जातयं, क्रांती वैगेरे होणार आहे का नाही या देशात की रोज असं तीळ तीळ तुटतं मरुन घ्याचं, काही कळतं नाही, झोप आली होती, झोपलो, दिवस उजाडला, आणि निघालो कामाला …….


——–समाप्त——-

-लेखनवाला    

( All Copyrights with The writer . Permission from the writer is mandatory before  publishing the article or the part thereof . Not to be shared in quotes , or paragraphs . If shared online, must be shared in totality . ) 

Leave a comment