चाळ आणि सार्वजनिक संडास

सार्वजनिक संडास ही झोपडपटटीतल्या चाळीतली सगळ्यात अत्यावश्यक जागा. आमच्या इथे एकूण संडास आठ, ते पण एकाच लाईनीत, संडासाला लागून दोन हातभर पुढे कठडा, कठडयाच्या आठव्या आणि चौथ्या संडासासमोरील भाग बंदिस्त करुन टाकलाय भिंती बांधून, बाकी तिस-या ते पहिल्या संडासासमोरच्या कठडयावर लोक बसू शकतात, संडासाला आपला नंबर यायला अवकाश असल्यावर वाट बघत उभं राहण्यासाठी या कठडयाचा लोक आसरा घेतात, संडासाच्या आवारात शिरायचा भाग पहिल्या संडासापासून सुरु होतो तो पुढे आठव्या संडासापर्यंत, त्यांच्या पुढे काटकोनी आकारात विटाच्या भितींचा कठडा संपतो, संडासाच्या पाठीमागे अरुंद अशी गल्ली असून तिच्या पलीकडे परत दाटीवाटीने घर आहेत. प्रत्येक संडासाच्या उंबरठयाची उंची किमान ढोप-यापेक्षा निम्मी, आतली बसायची व्यवस्था भारतीय बैठकीवाली. प्रत्येकानं घरुन चिंपाट आणायचं, संडासाच्या बादलीला लोक ‘चिंपाट’ म्हणतात. संडासाच्या आतमध्ये कुणी गेलं असल्यास संडासाच्या दरवाजासमोरच्या जागेत चिंपाट ठेवतात, जास्तच गर्दी झाल्यावर मग चिंपाट ठेवायला मुश्कील होते, बरं ही बादली दरवाज्यासमोर अश्या पदधतीने ठेवली जाते जेणेकरुन संडासाच्या आतमधून बाहेर येणा-या माणसाला जायला जागा होईल, लोक अगदी कडेकडेला संडासाच्या बादल्या ठेवतात आणि आपल्या नंबराची वाट बघत समोरच्या कठडयाला जाऊन टेकतात, पुरुष मंडळी या कठडयावर बसतात अजूनपर्यंत कोणत्या बाईमाणसाला कठडयावर बसताना बघितलेलं नाही, काही बायका मात्र ठरवून संडासला जायचं म्हणून हातात काळी मशेरी घेवून येतात, काही पुढारलेले तरुण हातात टूथब्रश घेवून येतात जेणेकरुन आपला नंबर येईपर्यंत दात घासता येतील, बरं थुंकण्यासाठीची सोय अशी काही नसतेच, बाजूच्या लादीकरणाने पॅक झालेल्या गटारातल्या नाजूकश्या भोकात बरोबर तोंडातली गुळणी थुंकण्याची कला या लोकांना इतक्या दिवसाच्या सवयीने आत्मसात केलीय, बाकी ज्यांच्या घरालगतच्या गटारापाशी हे सगळ्ं होत असतं त्याला काही बोलता येतं नाही ते भाडोत्री असतात. हल्ली  एक नवीन कुटंब राहायला आलायं पार आई-बहिणी वरुन शिव्या देतात पण लोक काय झाट ऐकत नाही त्यांची भितं पार काळीभोर करुन टाकलीय.

सगळ्या संडासाला आतून सफेद रंगाच्या स्टाईलच्या लादया लावल्यात, बाहेरच्या भिंतीना पण लावल्यात पण त्या नुसत्या सफेद आणि निळ्या रंगाच्या आहेत, संडासाचा उंबरठा, कडपा आणि दरवाजा लाकडाचा बसवलाय, जो पूर्वी लोंखडाचा होता, जो पाण्यामुळे लवकर झिजून गेला, नंतर नगरसेवकाने लाकडाचे दरवाजे बसवून दिलेत, कंडपाच्या उजव्या बाजूला टाळा अडकवलाय साखळीने, अपवाद संडास नंबर तीन, तिथंला टाळा तुटल्यापासून नवीन बसवलाचं नाहीय तिकडच्या लोकांनी, प्रत्येक घरी चावी दिली गेलीय त्या त्या नंबरच्या संडासाची, प्रत्येकाने संडासाला येताना संडासच्या बादलीसोबत चावीसुदधा आणायची जेणेकरुन संडासाला टाळा असेल तर उघडता येईल, सकाळच्या वेळी संडासाच्या चावीची गरज नसते, एका मागोमाग लोक येतच असतात त्यामुळे संडास बंद करण्याचा प्रश्नच येत नाही, पण मुळात प्रश्न येतो इथं टाळा लावण्याचा प्रश्न का येतोय यांचा, तुम्ही तीन नंबर बघितला नाही म्हणून असं बोलताय, एकदा संडास उघडा दिसला की मग कुणी पण घुसतं, मग घाणघूण वाढते, त्यासाठी हा टाळा-चावीचा खटाटोप, इथं लोक संडास आपला आहे असं समजून वापरतात. बाकी संडास आतून बंदिस्त खिडकी वैगरे असा काही प्रकार नाही फक्त पुढच्या बाजूला एकदम वरती सूर्यप्रकाश येण्याजोग्या छोटया जागेचा काय तो आसरा, तिथं तंबाखू आणि चुन्याची व्यसन इतरांपासून लपवत आपल्या सवयी जपण्यासाठी वापर केला जातो.

साधारणतः प्रत्येकाच्या घरात एकच चिंपाट म्हणजे संडासची बादली जिला काही जणं बोलताना बाडली असं म्हणतता, पूर्वी टमरेल म्हणायचे, काही घरामध्ये एकाच वेळी दोन लोकांना जर जायचं असेल तर मग नेहमीच्या चिंपाटा बरोबर अजून एक चिंपाट बाळगतात. जास्त करुन लोक दिवाळीला घरचा कलर काढायला आणलेला प्लॅस्टिकचा डबा संडासची बादली म्हणून वापरतात, बरं पूर्वी हा कलरचा डबा हातात पकडण्यासाठी वायरीचा वापर करायचे. घरातला एखादा मेंबर अगोदर संडासला गेला असेल तर मग दुसरा मेंबर कलरवाला डबा घेऊन त्या संडासाच्या इथल्या कठडयावर ठेवतात, मग तो संडासातून बाहेर आल्यावर रिकामी चिंपाट खाली जमीनिवर ठेवतात आणि कठडयावरच्या भरलेल्या कलरवाल्या चिंपाटतलं पाणी ओततात. सगळे जण हे असं करत नाहीत, पण ही आहे ती पदधत पण कोण मोडत नाही. यात, अजूनही एकच चिंपाट संडासला वापरतो असा मतितार्थ इतर बोध वैगरे असा काही हाेत नाही.   

इकडे संडासाच्या ठिकाणी सकाळच्यावेळी तातकळत उभे असताना आजूबाजूच्या रुममधून साईबाबांची गाणी नाहीतर मग एखादं मंत्रोउच्चारण चालू असतं, काही लोकांना खूप उशीर लागतो, दहा मिनिटं ही कमाल मर्यादा आहे, आणि संडासात गेला रे गेला की लगेच उठणं ही किमान. जे लगेच उठतात त्यांच्यात परोपकार, त्याग हयांचा गुण दिसतो. एखादा नवीन माणूस चिपाट घेवून संडासला आलेला दिसला की समजायचं की कुणीतरी नवीन भाडोत्री  किंवा मग कुणाकडे तरी पाहुणा आलाय असं समजावं.

 कधी कधी कुणी तरी संडासात घाण ठेवून जात आणि मग कुणी आत जायला मागत नाही सकाळची वेळ असेल तर गर्दी वाढत जाते, मग ज्याला जोरात झाली असेल किवां मग ज्यांचा पहिला नंबर असेल तोच मग पाणी ओततो, पार त्या अज्ञात माणसांची आई बहिणं काढली जाते, अशी माणसं सहजासहजी सापडत नाहीत पण कधी कधी सापडतात, मग काय आजूबाजूला लोक जास्तच असतील तर “थांबा घाण आहे पाणी आणतो” म्हणून सांगतात, काही जण उधटपणे “पहिल्यापासूनच घाण होती” म्हणतात आणि वाटेला लागतात. मग पुढचा माणूस थोडसं पाणी ओततो, समाधान झालं तर जातो, नाहीतर मग सगळं पाणी ओततो.

इथं काही संडासाची साफसफाई त्या त्या चाळीतली लोक करतात तर काही संडास एका विशिष्ट समाजाची लोक साफ करतात, त्यांना पूर्वी ऐका विशिष्ट नावाने बोललं जायचं आता ही काही लोक कळत-नकळत समाजाच्या नावाने थिजवत बोलतात, आता मात्र ही लोक स्वतःहून त्यांना तसं बोलताना रोखतात, हल्ली काही सिनेमा कलाकारांची प्रकरण ताजी आहेत हया समाजाला त्यांच्या अवहेलनाकारक नावाने बोलल्याबददल.

सकाळी सहा ते आठच्या सुमारास होणा-या गर्दीचं कारण हे कामावर सकाळच्या डयुटीवर कामावर जाणारी घरातली करती मंडळी, शाळेत जाणारी मुलं, त्यांच्यासाठी डबा करायला उठणा-या बायका यांच्यामुळे होते, यांत सात वाजण्याच्या सुमारास जरा जास्तच घाई असतें, यांत तुम्ही सात वाजता जर तिथं नंबर लावलात तर मग तुमच्या सहनशक्तीची परिक्षा सुरु होते, यात ही काही जणांना आल्या आल्या चिंपाट ठेवल्या ठेवल्या नंबर हवा असतो. अगोदरचं चार नंबर असतील आणि त्यांत स्वत:चा पाचवा नंबर असेल तर लगेच जाण्याची आशा धुसर असते तरी देखील ही लोक चान्स घेतात आणि यांत बायका आघाडीवर असतात, सुरवातीला विचारणार “कोण गेलयं?”, तुम्ही म्हटलं “अमुक अमुक जण गेलाय”, मग विचारणारं “कधी गेलीय किंवा गेलाय?”, हे तुम्ही सांगितलेल्या टाईमिंगवरुन त्यांची कमाल-किमानवाली रेजं ठरवणारं, हळू हळू तुम्ही पकडून बाकीच्या चार नंबराकडे नजर टाकणार आणि टाईमाचं गणित मांडत “म्हणजे पंधरा मिनिटं तर लागतील” हे संगळ त्यांच्या मनातल्या मनात चालू असतं आणि बाकीच्या संडासाकडे एक नजर फिरते खरी पण तिकडे पण तेवढेच नंबर असतात मग नाईलाजाने आपल्या मूळ संडासाकडे यावं लागतं, पण लगेच पुढचा प्रश्न येतो आता लगेच कोणाचा नंबर आहे, बाकीचे तिघे तुमच्याकडे बघणार आणि तुम्ही म्हटलं तुमचा की लगेच या बायका पुटपुटणार “मी जाऊन येते, पाणी ठेवलंय तापत गॅसवर, लगेच येते जाऊन” यांत बिचारा जो चौथा आलायं तो आता आपोआप पाचवा होतो, तुम्ही हो की नाय कायच म्हणत नाय, या बाईसाहेब मात्र एकदम संडासाच्या दारालागी उभ्या राहतात, हे संगळ तुम्ही सहन करु शकता कितपत, जेव्हा प्रंसग तुमच्या नियंत्रणात आहे तोवर, नाहीतर तुम्ही तुमचा संडासाला लावलेला नंबर आकाशातून खाली देव जरी उतरला तरी देणार नाहीत.

काहीवेळा मात्र खूप सारा वेळ झाला तरी आतला संडासातला माणूस बाहेर येत नाही, तुम्ही समोरच्याला विचारता कोण गेलंय तो म्हणतो माहित नाही, आता आजूबाजूच्या संडासातून चार चार जण जाऊन बाहेर येतात, आपल्या इथले नंबर वाढत जातात शेवटी एक जण म्हणतो की किमान दरवाजा तरी ठोकव, मग एक जण कुणीतरी दरवाजा ठोकवायला जातो, या ठोकवण्यात दरवाजा पुढे लकटला जातो, कुणीतरी फक्त संडासातून बाहेर पडताना नुसताच दरवाजा आड करुन बाहेरुन कढी न लावता निघून गेलेला असतो, तुम्ही आणि बाकीची लोकं आतल्या आत स्वतःला आणि त्या अज्ञाताला शिव्या घालता आणि पुढच्या वेळेपासून सतर्क व्हायची विधान करता, आणि लगेच दुस-या दिवशीपासून दरवाजा पुढे ढकलून पाहतात, काही वेळा कुणीतरी आतून कढी लावायला विसरतं आणि तुम्ही दरवाजा पुढे लकटता….. आतला माणूस कावरा बावरा होतं आतून कढी लावतो, बाहेर त्याचं हसं झालेलं असतो, तो देखील इंथून कधी एकदा सुटका होईल या आवेशतच बाहेर पडतो. पुढचे काही दिवस यांचीच चर्चा रंगते ज्यांच्यासोबत झालं तो मग संडासला यांयच टाईमिंग बदलतो. 

आणखी एक मजेदार प्रकार, हा नियम आहे इंथला, लोक काय करतात बघा, तुम्ही संडासा जवळ येता तुमचं चिंपाट अजूनही हातातच असतं, आल्या आल्या आधी बाकीची एकूण चिंपाट मोजता तुमच्या संडासासमोरची, एकूण संख्या चार, समोर माणसं बघता, इतक्या वर्षाच्या रहिवाशी वावरामुळे कुठल्या संडासात कोण जातं बरोबर माहितं असतं, आपल्या संडासात जाणारी माणसं तीन अर्थात तुम्ही सोडून, म्हणजे एक चिंपाट जास्त आहे, तुम्ही तुमचं चिंपाट ठेवता, थोडा वेळ जातो, आता तुमचा नंबर येतो तुम्ही तयारीत असता, आणि लगेच एक तुमच्या संडासात जाणारा माणूस तिथं येतो, चिंपाट हातात न घेता, ते मघाचं जास्तीचं चिंपाट हयाचं असतं आणि आता तो संडासातला माणूस बाहेर आला की तुम्ही नाही….. आता तोच जाणार आहे….. कारण त्याने चिंपाटच अगोदर ठेवून गेला होता, तो ऐटीत अजीमो शान शहेनशहा अश्या थाटात तिथं चिंपाट उचलतो आणि आपण मात्र “हा अन्याय आहे” चा आंवढा गिळत पुन्हा कमाल-किमानवाल्या रेजंची मोजमाप करायला लागतो, बरं या सगळ्यातून जर एखादं शाळेचा गणवेश घातलेला कार्टा किंवा कार्टी आली की मग अजूनच थांबायला लागत, बरं हे एकटे येत नाही आईलासोबत घेवूनच येतात, आणि त्यांची आई आजूबाजूची परिस्थिती न बघता बोलत सुटते “आता कोणी बाहेर आलं की लगेच जा, शाळेत जायला उशीर झालायं”, इथं तुमच्या संयमाच्या परिसीमेचा कस लागतो.  

काही बायका मात्र निव्वळ टाईमपास करायला संडासला येतात, त्यांना काहीचं टाईमचं पडलेलं नसतं, त्या आपल्या पाठीमागून आलेल्या नंबराला पण जाऊ देतात त्यांना फक्त विषय काढणा-या आणि त्यावर बोलणा-या बायका हव्या असतात, आपल्या संसाराची, सासू-सास-यांची, घरादाराची, ‘हीच काय चालयं, तिच काय चालयं’ची खबर बात मिळवण्यासाठी खास ही जागा निवडतात अर्थात दोन्ही बायकांच्या हातात काळी मशेरी असेल तर विषय रंगण्याचे चान्स जास्त असतात.  

कधी कधी एखादया संडासाला अजिबात गर्दी नसते आणि दुस-या संडासला असते, मग अश्यावेळी लोक दुस-या गर्दी नसलेल्या संडासात जातात, ही “आपलं काय काम झाल्याशी मतलब” आटिटयूडवाली माणसं, पण सगळीचं तशी नसतात काहीना ‘आपल्या वाल्या संडासा’तच जायचं असतं त्याशिवाय त्यांना साफ संडासला होतच नाही, पण काही वेळा काही लोक संरमजशाही दाखवतात, आपलं उरकलं की बाहेर बघतात आपल्या नंबरापुढे कोणाचं चिंपाट नाहीय, आजूबाजूच्या संडासासमोर लोक तसेच तातकळत उभे असतात, हे महाशय आपलं उरकलं की आपल्यावाल्या संडासाला बाहेरुन कढी लावतात आणि मुददमून खिश्यातली चावी काढत टाळा ठोकतात. आणि लोकांनी एकावं म्हणून मोठयानं बोलतात, “संडास उघडा ठेवायला काय नाय, पण परत घाण करुन ठेवतात, त्यापेक्षा चावी लावलेली बरी”, या अश्या माणसाना दया नावाचा प्रकार माहित नसतो. ही अश्या टाईपची लोक घरी जाऊन आधी टी व्ही वर दया, क्षमा, शांतीवाली प्रवचन लावतात, काही माणसं मात्र परोपकार दाखवतात, मग एखादया संडासासमोरची वाढलेली गर्दीतली माणसं तिकडं वळतात, पण टाळा लागलेला असेल तर मग तुबंलेल्या पाण्यासारखी अवस्था होते आणि एकाच ठिकाणी भलीमोठी संडासाच्या चिंपाटाची लाईन लागते.   

हया आठी संडासात जाणारी जनता ही चाळवार विभागली गेलीय, आमच्या चाळीसाठी म्हणजे इथल्या जागेवर संडास हाय तिथल्या लोकासाठी तीन नंबर आणि चार नंबर संडास, आमच्या चाळीच्या वरच्या चाळीसाठी पाच नंबर आणि सहा नंबर, आणि खालच्या चाळीतल्या लोकांसाठी पहिला आणि दुसरा नंबर, उरलेल्यासाठी सात आणि आठ नंबर. संडासाच्या देखभालीसाठी प्रत्येक घरामागे तीस रुपये घेतात वर्षाकाठी छत्तीशे.. यात संडास दर आठवडयाला धुण्यासाठी ठेवलेल्या माणसाला दयायचे पैसे जोडलेले नाहीत ते वेगळे. बरं संडासाची देखभाल म्हणजे काय? संडासात मीठ वैगेरे टाकायचं असेल तेव्हा हे पैसे वापरतात.

काही लोकांना तंबाखू-मुनचंद (गोवा-मावा प्रकारातील एक जिन्नसी उपप्रकार) खाल्याशिवाय साफ होतचं नाय….. त्यांना चघळायलाच लागत. बरं ते पण आपला नंबर येण्याची वाट बघत असतात, आता चघळलेलं द्रावण तोंडात किती वेळ ठेवणार मग त्या आठव्या संडासालागी असलेल्या काटकोनी आकाराच्या बरोबर मध्यभागच्या दुमडलेल्या कोण्यावर लाल रंगाचे फवारे उडवतात, वाईट वाटत कारण या संडासाच्या भितीं पण सत्यनारायणाच्या पूजेच्या आदल्या रात्री रंगवतात, या संडासाच्या भिंतीतल्या एका भिंतीवर ‘येथे थुंकू नका, स्वच्छता राखा’ असं लिहितात.    

आजूबाजूच्या परिसरात दूरदूरपर्यंत झोपडपटटी पसरवलीय….. सगळ्या मोकळ्या जागेत झोपडपटटी बसवलीय….. या वाढत्या लोकासं संडास अपुरे पडू लागलेत त्यासाठी बहुतेक ठिकाणचे संडास बहुमजली केलेयत, लोक म्हणतात सरकारनं जगण्याची हौस नाय ती नाय, किमान घगण्याची सोय तरी बिल्डींगटाईप जागेत करुन टाकलीय. 

एवढा सगळा द्रविडी प्राणायाम करुन एकदा का आतमध्ये शिरलो की मग अगोदरचा सगळा त्राण निघून जातो, तुमच्या डोक्यात विचार येऊ लागतात, नवीन नवीन कल्पना तंरगु लागतात, इकडं पोट साफ होत असतं, आज ‘आपला नंबर लगेच आला, आता अख्खा दिवस चांगला जाणार बहुतेक’ हा विचार असतो.

जसजसा टाईम सरकू लागतो मग सकाळी दहा नंतर संडासापाशी शुकशुकाट पसरतो, काही तासापूर्वीचा कोलाहल नाहीसा होतो, बाकी रात्री म्हणाल तर तितकीं विशेष काही गर्दी नसते, पण काही संडासात लाईट नसते बहुतेक लोकांना सवय झालीय त्यांना आतला माहौल ओळखीचा आहे, काही जण बॅटरी घेवून येतात काही जण मेणबत्या घेवून येतात, ज्या संडासात लाईट आहे त्यांचे पैसे त्या संडासातल्या लोकांकडून घेतात, सगळ्या लोकांना परवडेल असं नाही, काही वेळेला संडासाच्या आतले बल्ब पण चोरीला जातात.

जुलाब वैगेरे झाल्यावर घराजवळ संडास असल्याचं महत्तव कळतं, सार्वजनिक संडास ज्या चाळीत त्या चाळीतल्या रुमला जास्त भाव असतो अस साधारण समज आहे, स्वच्छतेच्या बाबतीत इथले संडास त्या मुबंईतल्या हमरस्त्यावाल्या बाकी चाळीपेक्षां कैकपटीने चांगले आहेत, त्यासाठी इथल्या लोकांची स्वच्छता रोगराई यांविषयी असलेली जागरुकता या गोष्टी आहेतच, त्याचं श्रेय हे रोज सकाळी उठल्यावर गटारावरुन भांडणा-या आणि काथा-साबण, फिनेल विकणा-या बरोबर दोन-तीन रुपयांसाठी घासाघीस करणा-या बायकाना जात इतकं मात्र नक्की.

-लेखनवाला    

( All Copyrights with The writer . Permission from the writer is mandatory before  publishing the article or the part thereof . Not to be shared in quotes , or paragraphs . If shared online, must be shared in totality . )

Leave a comment