आले ‘बोक्या’च्या मनी

पुढयात पडलेल्या मादेली, पापलेटच्या घरी तळलेल्या या खंडक्या पुढचे काही दिवस ताटात पडणार नव्हत्या, देवदर्शनासाठी बाहेरगावी रेल्वेने जाणारं होते बहुतेक सगळे… त्याच लगबगीत होते सारे… सामानाची बांधाबाध सुरु झाली…. आणि अखेरीस तो दिवस उजाडला…. तयारी झाली एकदाची, एक-एक करत सगळ्या बॅगा घराबाहेर आल्या, कुलूप लावण्याअगोदर, लाईटचा मेन स्वीच बंद केल्याचं पुन्हा बघितलं, गॅसचा रेग्युलेटर दोनदा चेक करुन झाला… हो संपला एकदा सोपस्कार… कढी लावली, कुलूप देखील लागला… चावी लावली… पुन्हा चावी लावली… पुन्हा एकदा कुलूप काढलं मी आतमध्ये रुसून बसलो होतो…. मला माहित होतं…हे मला नेत नाहीत… मला अलगद उचलत बाहेर आणलं.. परत एकदा कुलूप कढी लावून झाली. मी दाराजवळच्या उंबरठावर तसाच शेपटी पसरवून उभा… सगळ्यानीं आपला उगाचच टाटा, बाय वैगरेचा खोटा रीतीरिवाज पार पाडला… गावी निघताना माझ्या जेवण्याखाण्याची व्यवस्था म्हणून खास सुका जवळा, बोबील यांनी भरलेला डबा शेजाराच्याकडे देत “सकाळं सध्याकाळ घाला त्याला थोडंथोडसं यातला आणि घराकडे लक्ष असू दया” म्हणत कुलूप लागल्याचं पुन्हा एकदा खात्री करुन घेतलं आणि सगळे निघून गेले. माझं मन हुरमुसल्यासारखं झालं, आता मी त्या शेजाराच्यांच्या घरातल्या उंबरठयावर येऊन थांबलो. चहाचा कप खाली ठेवत शेजारीणबाईनी आमच्या घरच्या चाव्या आपल्या घरातल्या समोरच्या भिंतीवरल्या खिळ्याला अडकवल्या. “मला सोबत नेलं असतं तर काय झालं असतं…” माझी मनातल्या मनात बडबड सुरु झाली. माझी काळजी वाटतयं दाखवण्यासाठी डबा देत हा सगळा शेजारधर्माचा खटाटोप का म्हणून करायचा ?… मी आता उंबरठयावरुन शेजारीणबाईच्या घरात प्रवेश केला. मघाचा कपातला अर्धां चहा संपवत दरवाज्यापाशी कोणी नसल्याची खात्री करुन मग शेजारीणबाई सुरु झाल्या “आता काय आम्हाला हीच काम राहिली हायत का यांच्या माजंराकडं अनं घरादाराकडं लक्ष ठेवायला….आम्हाला काय, वाटत नाय..जनावरं पाळावाशी …पण दुस-याच्यां डोक्यावर ओझ का म्हणून दयायचं, एवढं बोके-माजंरी पाळायचे शौक तर घेवून जायचं आपल्यासोबत” शेजारीणबाई तावातावानं बोलत सुटल्या. थोडं का होईना माझ्या मनातलचं बोलल्या, मला थोडं हायसं वाटलं. 

थोडयावेळानं त्यांनी तो जवळयाचा डबा उघडला, डब्यातला सगळा जवळा माझ्या पुढं केला, माझा राग अजूनही गेला नव्हता… मी कशाला खातोय जवळा….. एवढयात त्याचें यजमान आतल्या खोलीतून बाहेर येऊन तिथे सोफयावर बसले. या शेजारीणबाईनीं मात्र माझ्या न खाण्याचा, घ्यायचा तो अर्थ घेतला आणि डबा बंद करत यजमानांकडे बघत “मी म्हटलं नव्हतं… हे आजकलचे बोके…मिजासी खाणं यांच…ताटात पडलेलं खायचें दिवस नाय राहिले आता…बाहेर चमचमीत खाल्यावर कुठे लागतेय घरच्या चपाती, भाजीची चव… ही या बोक्याची त-हा तर माणसं का नाय चकाळणार….” रात्री कारल्याची भाजी न खाता ताटात तशीच ठेवलेल्या आपल्या नव-याला शेलक्या शब्दात टोमणा देण्यासाठी शेजारीणबाईचं हे बोलणं सुरु आहे, हे न समजण्याइतका मी काही दूधखुळा नव्हतो (शब्दश: घेवू नये…मी प्रत्यक्षात ….ठार दूध नादखुळा आहे….असो…असणारच…तो आमचा जन्मसिदध अधिकार आहे)… आणि कोण या बाईसाहेबाचं बोलणं मनावर घेईल (तेवढं तरी निर्ल्लज असावं… (निवस्त्र असलेल्याना कुठे असते लाज)…(कंस तरी का टाकायचे? (आतलं लिहण्यासाठी))). माझ्या त्या डब्याकडे ढुंकूनही न बघण्याचा या शेजारीणबाईनी येणा-या बुधवार, शुक्रवारच्या यजमानासाठी करायच्या डब्याचा मेनू सुटल्याचा मतितार्थ घेतला आणि आपलं आपलं ठरवतं स्वतःच्या “मार्गशीषात नेहमी नेहमी काय-काय म्हणून कडधान्य करायचं” या अस्टरच्या फुलांची बाग डोक्यात भरवण्याचा प्रघात चालू ठेवणा-या प्रपंचिक संमेलनातल्या समाप्तीच्या घोळक्यात चोथा होत आलेल्या “अजून एक मार्गशीषचा गुरुवार बाकी आहे हो” वाक्याचं शेवटचं रवथं होणं थांबत “संपला एकदाचा मार्गशीष्” म्हणत सुक्या जवळ्या बरोबर वांगी घालू की बटाटी या यक्षप्रश्नास पर्याय म्हणून आपल्या यजमानाच्या समोर सुरी आणि टॉमेटे पुढे केले, दुस-या घटकेस आज्ञा शिरसांवदय मानत एकेकाळच्या वाघ असण्याच्या आपल्या आठवणीनां धूसर करत ताटाखालचं मांजर होण्याच्या दुर्मिळ प्रंसगास साक्षी बनवत मनुष्य उत्क्रांतीच्या टप्प्यात मांजर जमातीचा अंश नक्की असल्याचा संशय बाळगत त्यांच्या यजमानांनी “इतके तुकडे बारीक बस का? की अजून कापू” म्हणत सुरीच्या धारेशी होत चालेले वाद आता सुरळीत करत एकजात केलेले टॉमेटेचे तुकडे पेश सुदधा करुन टाकले.

माझं मन काय तिथं रमेना…शेपटीचे हेलकावे तरी कितीवेळ देत बसणार….तरी देखील मी उगाचच येरझा-या घालत होतो शेवटी वैतागून निघणार इतक्यात, या बाईनी खुळखुळासारखा वाजणारा पिजंरा माझ्यासमोर आणून ठेवला, हो… तोच तो उंदीर पकडण्याचा चापासकटचा लोखंडी पिजंरा… हो आत उंदीरसुदधा होता (नाहीतर काय देखाव्यासाठी माझ्या समोर ठेवतील…) .उंदीर नाही हो… उंदराचं छोटसं पिल्लू (पिल्लू छोटसंच असणार ना)… असून नसल्यासारखं… मला जरासुदधा एक्साइटमेटं वाटली नाही… पहिल्यादा प्राणीसंग्रहालय बघायल्या गेलेल्या लहान पोरासारखीं ती नवरा-बायको पिजंराकडे आणि त्यानंतर “याला तुला खायचंय हा!” या डोळ्याच्या खूणा करत माझ्याकडे बघत होते… ” काय हा ढिम्मपणा या बोक्याचा…थोंड थोडं म्याँव म्याँव तरी कर…” या शेजारीणबाई अजून पिजंरा पुढे करुन म्हटल्या. “कुठून येतात उंदीर काय माहिती…” याचं आता हे मूषकशोधपुराण सुरु होणार मला ठाऊकचं होतं, यांच्या यजमानांनी देखील आमच्या घरच्यासारखंच उत्तरादाखल बोलले ”शेजाराच्या घरातून येत असणार बहुतेक” फरक इतकाच एकमेकांच्या बाजूला असलेल्या भितींकडे दाखवणारं याचं बोट डावीकडं होतं आणि आमच्याचं उजवीकडं…समान भिंतीतला छोटासा पोखरुन ठेवलेला होल… उंदराच्या येण्या-जाण्याचा खुष्कीचा मार्गं… कोण बुझवणार?… दोन्ही घरातून कडाडून एकमेंकाकडे बोट दाखवणं चालू असतं (महापुरुषाच्या पुतळ्याकडून घेतलेला गुण)… इकडे तो इवलासा उंदीर मात्र त्या पिंजरात परिक्रमा मागून परिक्रमा घालत होता. बहुतेक त्याला आमचं नातं ठाऊक नसावं… मी वचक म्हणून एक पंजा त्या पिजं-यावर ठेवला. त्या शेजारीणबाईच्या यजमानानां आता हायसं वाटलं. त्यांना (आपली) / माझी शिकार माझ्या तोंडात सुपुर्द करुन स्वतःच्या घरातली ब्याद संपावयची होती, पण मला यांच्यात काडीचाही रस नव्हता. माझा एक पंजा पिजंराजवळ ठेवताच तो इवलासा जीव पिजं-यातल्या एका कोप-यात निवांत मटकन बसला. मी पंजा काढला आणि त्याची वळवळ पुन्हा सुरु “अहो पिजंरा बाहेर न्या… नाल्याजवळ… तिकडचं खाऊ देत या बोक्याला…” आणि… पुढच्या योजनाबदध कार्यक्रमचं शेजारीणबाई विधी सांगण्याअगोदरचं… त्यांच्या यजमानांनी “पण…पंरतु…” या शब्दाची आळवणी सुरु करत आळशीपणाशी बांधील राहण्याचा प्रयत्न केला. “न्यायलाच हवा काय? हा बोका नेल ना तोडांत घालून…” चालू होतं दोघा नवरा बायकोचं संसारमंथन… मला या उंदाराच्या पिल्लाला खाण्यात अजिबात रस नव्हता… मी मुळीच पकडणार नव्हतो…पण त्यानां विश्वास होता…नव्हे त्यांना खात्री होती आमच्या वै-याबदल…त्यांनी चाप हलका सोडायचा.. त्यामुळे लोंखडी पिंज-याच दार हळूच उघडणार… उंदीर नाईलाजाने टूणकण ऊडी मारुन बाहेर येणार… मी एका पंजात पकडत दुस-या क्षणाला तोंडात घेत.. घराबाहेर त्यांचा फडश्या पाडणार… पण नाही … तसं काहीच घडणार नव्हतं.. एव्हाना घडलं ही नाही… यजमानानीं आळशीपणावर आरुढ होतं नाल्यावर पिजंरा न नेता इथचं पिजंरा उघडण्याचं ठरवलं….. त्यांनी चाप ओढला…मी आपलं बघितल्या न बघितल्या सारखं केलं…आणि काय होणार…हे छोटे राजे पसार…जगप्रवास करायला मोकळे… लॉटरी एका अंकाने चुकल्यासारखा चेहरा झाला होता यजमानाचा.. आणि यामुळे शेजारीणबाईचा पारा चढला. त्यांची ती नेहमीची शिव्याची कॅसेट सुरु करणारच होत्या… “शिरा पडली…. सांगितलय होतयं… बाहेर जाऊन पिजंरो उघडा… या बोकाच्यो चवी लय हत… तो असला काय खावचो नाय रांडेचो …आता अख्ख्या घरभर फिरीत बसात यो पाजिवलो…. अक्करमाशी… उंदीराची जात” जरा काही मनासारखा झालं नाही की मग सरळ मालवणीत सुरु होतं…… शेजारीणबाई… हे सगळ निमूटपणे ऐकून घेत यजमानांनी हार न मानता आपल्या खात्यातलं अजून एक ब्रम्हास्त्र वापरलं, आणि ते कामी सुदधा आलं…ते ब्रम्हास्त्र तो लोखंडी पिंजरा नव्हता हे विशेष…. काही मिनिटातचं बिचारं नुसत उंदीराचं एकच पिल्लू…नाही आणि त्यांच्या सोबत अजून एक उंदीर माझ्यासमोर !… एका दगडात दोन पक्षी मारल्याचा अनुभव किमान उंदीरांबाबत सांगण्यास मिळाल्याचा आनंद यजमानाच्या चेह-यावर दिसत होता. काय बरं केलं त्यानी?

आजकालचं नवं फॅड… एका पुठयावर चिकट गम काय लावतात… त्यावर तो बिचारा इवलासा जीव चिकटला की देतात माझ्या पुढं सोडून… यांच्या ताटाखालचं माजंर व्हायचे दिवस नाय राहले आता… दोन घटका त्यांनी पुठठा माझ्यासमोर ठेवला… मी जागेवरुनसुदधा हललो नाही. माझं मौन व्रत बघत त्यांनी उंदीराच्या पुठठयासकट नाल्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली. नाही म्हणायला माझीही काही उपासमारी होण्यासारखी परिस्थिती नव्हती तशी…. देवाच्या कृपेने दोन वेळचं पोट भरण्याइतकं तरी घराबाहेर नक्की मिळेल अशी आशा होती (घराच्या बाजूलाचं रेशनिंगचं नीळं आणि सफेद केरोसीन ब्लॅकने (काळ्या बाझारने बोलणं आऊटडेटेड झालयं…परिस्थिती तिचं असूनसुदधा….), खडीमिश्रित धान्य इत्यादी ध्यान देऊन विकणा-या, जास्तीचा एरीया वाढवतं किराणामालाचं दुकान थाटलेल्यांचं गोदाम असल्यावर मूषकाचा वावर तर कोळ्या भोवतल्याच्या जाळयाइतकं साहजिकचं आहे….(केवढा मोठा कंस…..संपला एकदाचा)), आता तुम्हाला म्हणून सांगतो, इतक्या मोठया धान्याच्या कोठार असतानाही आमच्या घरच्या देव्हाऱ्यातल्या पणतीतली वात चोरुन नेणा-या उंदीरबददल मला प्रचंड दया येते (…वात पळवण्याचा असतो एकएका उंदाराचा छंद…आणि त्यांना गटटम करणं हा माझा छंद….). पण यांना पकडताना मात्र काही वेळा माझी फसगत होते… भाद्रपद-माघी गणेशोत्सवाचा काळ असतो बहुतेक…आणि गणेशमूर्तीला नाईलाजाने नतमस्तक व्हावं लागत… (मूर्तीकारानं जिवंतपण आण्याचा प्रयत्न केल्यावर होतं असं…कधी…कधी…कोणं उंदारानां श्रेय देणार…छे…मी तरी नाही देणार)….जाऊ दया किमान त्या निमित्ताने तरी गणपतीच्या मूर्तीला लीन होता येत नाहीतर आमच्यासारखचं सार लक्षं त्या पळीभर तीर्थतून पडणा-या एक दोन थेंबाकडच्या प्रसादाकडे जास्त असतं. पण उंदीर पकडण्याचा माझा सोस आजकाल कमी झाल्यायं, कोणती गनिमीकावावाली कसरत करत बसणार?

हल्ली एक घबाड हाताला (पायाला) लागलं होतं, उंदीर खायचा मूडच नाही व्हायचा, मच्छी आयती मिळतं चालली होती… ताज्या ताज्या सुरमई पापलेट… त्यामुळे घरी ही फार कमी जेवण होत होतं..…हो आज पुन्हा तिथंच चाललोयं… मासळी बाजरातल्या शेवटच्या रांगेत बसणा-या त्या मच्छीवाल्या बाईपाशी येऊन थांबलो, आज गर्दी नव्हती गुरुवार ना… माझा नित्याचा ठरलेला कार्यक्रम…मागच्या बाजूला सारलेल्या टोपलीतले मासे हळूच तोडांत घालत मुकाटपणे एखादा सुनसान कोपरा पकडायचा….…हे मी सगळं माजंरी पावलाची जोड देत करायचो (तुम्हाला काय कॅट वॉक अपेक्षित आहे की काय)… तिला देखील टोपलीतली मासळी जरा जास्तच खपत असल्याचा अंत्यातिक आंनद व्हायचा….बिचारी कुठली (संवेदना..हो संवेदना (कळेल पुढे))….. हल्ली ईथे कावळयाचा वावर वाढला आणि त्या तिथे पलीकडे स्माशनभूमीजवळ पिंड न घेणा-या आत्म्याची संख्या वाढू लागली…. तर असो… माझी भूक चवताळली होती, मी नेहमीप्रमाणे पोहचलो, मच्छीवाली सुरमई कापण्यात व्यस्त….मी तिच्या मागच्या टोपलीकडे बघितलं… टोपलीवरच्या आवरणाला छेद देत आत डोकावलं… माझ्या मिशानां थंडपणा जाणवतं होता… बर्फात शहीद झालेल्या…. सुरमई.. पापलेट.. वा एकदम ताज्या ताज्या. मी पुन्हा टोपली बाहेर माझं डोकं काढलं… सगळीकडें निरखून बघितलं… सुरमईचे तुकडे करण्यात मच्छीवाली गुंतली होती… मी पुन्हा टोपलीत डोकं घुसवलं… आणि तोडांत सुरमई घेणार इतक्यात थंडपणाची सगळी झालर दूर सारत काहीतरी जोरदार आदळण्यासाठी येत असल्याची हलकी चाहूल झाली पण शे उशीर झाला…घात झाला… घोर अनर्थ झाला… इतक्या दिवस सुरु असलेल्या आभासी व्यवहाराचा पडदा पाश करत भम्रनिराशेचा जमा झालेला एक मोठा ढग तिनें म्हणजे मच्छीवालीने बाजूला ठेवलेला मोठा धोपाटणा माझ्या पार्श्वभागावर मारत पुसून टाकला “तरी म्हणतें इतके दिवस मोठमोठाली पापलेटं सुरमई गायब व्हातातचं कशी….” ती बोलतच सुटली. तिच्या चेह-यावर क्राइम मालिकेतल्या पोलिसाने चो-याला पकडल्याचं (आणि बदडल्याचं) सुख दिसत होतं… खाताना डोळे मिटण्याची जन्मजात सवय असल्यामुळे दिवसा तारे दिसण्याचे प्रंसग येणं साहजिक होतं (तुम्हाला देहाची तिजोरी गाणं आठवण्याची काही गरज नाही). 

“कोणता बरे माणूस आज समोरुन रस्त्यावरुन आडवा गेला असेल, या इथे धोपाटणा कसा बरे आला” या आणि अनेक घडलेल्या घटनांचा मागोवा डोळे मिटत (अंध) श्रध्देने करण्यात गुंतून घेत आपली अशी इज्जतीची शक्कल बाहेर आल्यावर मी म्यावं म्यावंच्या पलीकडे काही न बोलताच करत निघालो (अजून दुसरं काही बोलू शकतो का आपणं… तुम्हीदेखील काही ही कल्पना करता राव!). पण शेवटी भावनेचा बांध सुटत बोललो त्या मच्छीवालींला “भिकारी कुठली” (वेदना..हो वेदना)… मनातल्या मनात….

 जखमा नसल्या तरी मुका मार होता.. सहनशक्तीची परीक्षा होती…आता मला काही राहावतं नव्हतं. भूकेमुळे पोटात कसकसंच व्हायला लागलं होतं. चालत चालत हमरस्तयावर आलो, मासळी बाजाराच्या रस्त्याकडुन आलेल्या लोकांच्या हाताकडे बघत होतो, काळी पिशवी घेऊन काहीजण येत होते. समोरच्या बाजूला प्लस्टिक बंदीचा फलक चिकटवलेला. म्हटलं आता हीच वेळ आहे सामाजिक बांधिलकी दाखवत पोटापाण्याचा प्रश्न मिटवण्याचा, अनुभव होता गाठीशी थोडा. येताना कुणी दिसलं रे दिसलं की झडप घालायची. यांच्या हातात कुठे तो मघासारखां धोपाटणा तर नाही ना यांची खात्री करुन घेतली…. झडप घातली पण…. मी नुसत्या काळ्या पिशवीकडे लक्ष दिल्यामुळे अंदाज चुकला, तो तर मदयाचे प्याले वाहणारे साधन (दारुच्या बाटल्या) निघाल्या.. माझा पुरता हिरमोड झाला….माझ्या या कारनाम्यामुळें मागचे मात्र मासळीवाहक सावध झाले, माझी अवस्था ना घर का ना घाटका अशी झाली… मी आता जवळ्याच्या डब्याची आठवण काढत आवढें गिळत होतो… आता मला त्या रेशनिगंवाल्याच्या गोदामात शिरणे क्रमप्राप्त होतं तिथं मला मुक्तकंठाने प्रवेश होता पण आज तेचं नेमकं रेशनिगंच दुकान बंद… गुरुवार होता….मला निमूटपणानं पुन्हा शेजारीणबाईकडे जाणारा रस्ता पकडावा लागला…

आताच रस्त्यावर केलेल्या झडपशाहीच्या कारनाम्याचा धसका मला लोकाच्यां हातातल्या कापडी पिशव्यातून दिसू लागला. काही महाभाग आमच्या झडपकार्याचे स्वतच्या प्लॅस्टिकबंदीच्या राबवलेल्या मोहिमेच्या यशस्वीपणाशी सांगड घालतात तेव्हा वाईट न वाटता कीव येते बाकी काही नाही, पण ते जाऊ दे विषय भरकटत चाललायं…. माझी भुक वाढतच चालली होती.. मला तर चालून चालून वैताग आला होता… एखादा बगळा नाहीतर कावळा डोक्यावरुन जावा… नकळत त्यांच्या तोंडातून माश्याचां तुकडा पडावा… (मी तरी काय इच्छा करुन बसलोय, माझ्या पोटातले कावळे शमवण्यासाठी डोक्यावरुन कावळे, बगळे मासे पुरवण्याची… असो)… पण तसं काही होणं नाही….इथे आमच्या आयुष्यात पण स्वप्न कधी सत्यात उतरणार नाही यांची मनुष्याप्रमाणे शाश्वती होऊन बसली होती…

मी आता एका मोठया सकारात्मक विचाराने नाल्यापाशी आलो पण निराशा हाती आली…ना चिकटगमाचा पुठठा होता… ना ती चिकटलेली उंदीरं…. सरकारला आजच स्वच्छतेचा पुळका आलेला दिसला… मला नाल्याच्या ठिकाणाहून माघार घ्यावी लागली…. मला माझ्या घरच्यांचा प्रंचड राग येत होता… मी घराजवळ आलो…मला समोर दुचाकी दिसली…जाऊन बसलो… घरचीचं होती… किती माया लावतो मी घरच्या सगळ्यांना…काहीच कसं वाटत नाही यांना… मी आतून पेटून उठलो होतो… ज्या सीटवर शेपटी सावरुन बसलो होतो तीच मी सीट नखाने टराटरा फाडू लागलो. त्या काळ्या रंगाच्या सीटचा वरचं आवरण फाटत आतलं पिवळ्या रंगाचं मऊ स्पजं बाहेर येऊ लागलं. भूक तर जोरदार लागली होती, वाटत होतं घरचे यावे…. पण बघतो तर काय घरची सगळी मंडळी समोरुन येताना दिसत होती…. मी माझे मोठाले डोळे पायाने साफ करुन बघितले… हो खरचं येत होते…. मला स्वत:ला इच्छाधारी माजंर बनत असल्यासारखं वाटत होतं. सगळ्यात पहिलं आधी त्या दुचाकीवरुन पसार झालो…हळूच दुसरीकडून बाहेर आलो..

शेजारीणबाईकडुन चावी घेत दरवाजा उघडला… बाकी घरच्या मंडळीनी बॅगा खांदयावरुन काढल्या. नेमकं झालं तरी काय, परत का आले सगळे, मी बोलणं निवातंपणे एकत होतो “तरी तुला म्हणत होतो रेल्वेची टिकीट तपासून घे एकदा पण नाही ऐकलसं” दुपारी तीनची म्हणून तो-यात गेलेल्या या मंडळीची गाडी रात्री तीनची होती जी कालच गेली होती. आता तिकीटाचे पैसे ही परत भेटणार नव्हते… दिवस आपलाच वाईट गेला नाही हे बघून बंर वाटलं. तरी बरं अजून मी केलेली सीटची चिरफाड यांच्या पाहण्यात नाही आलीय. वातावरण अजूनही तापलेलं होतं. जेवणाची लगबग सुरु झाली…मला तेच हवं होत… घरात घमघमाट पसरला, माझ्या पोटात दोन मांदेल्या गेल्यावर माझा जीव शांत झाला.

अजूनही मंडळी एकमेकांवर राग काढतच होती, एकानं वैतागून टी.व्ही लावला…. न्यूज चॅनल सुरु होतं, शेजारीणबाई आमच्या घरीची मंडळी परत येण्याचं कारण भितींआडून कळून सुदधा मुददामहून जवळ्याचा डबा परत करण्यासाठी आल्या तरीदेखील त्यांच्या चेह-यांवर, आता नेमका कोणता नवा मेनू यजमानाच्या डब्यासाठी करायचा यांची काळजी दिसत होती. “का हो आलात परत” शेजारीणबाईनी ठिणगी टाकली. थोडं निव्वळलेलं वातावरण आता अजून तापणार बहुतेक, “सगळी चुकी त्या कुमारचीच आहे, तिकीटीवरचा टाईम कन्फर्म करायला नको होता का ?”, जाऊ दे आता… होतात चुका सगळ्याकडनं…” ”आता दुसरी रेल्वे उदयाची आहे तिचा तरी टायमिंग नीट बघा” मघासपासून थांबलेलं रिपीट संभाषण शेजारीणबाईच्या येण्यानं पुन्हा सुरु झालं. इतक्यात टी. व्हीवर ब्रेकिंग न्यूज सुरु झाली… रेल्वे अपघाताचीच…गाडी रुळावरुन घसरण्याचीच..तीच एक्सप्रेस होती…माझ्या जवळा न खाण्याची बात शेजारीणबाई घरातल्यांना सागत होत्या, त्या ही अचानक टी. व्ही कडे बघू लागल्या, घरातल्याचं टिकीटावरचा डबा क्रंमाक बघणं सुरु होतं….नेमके तेच डबे घसरले होते… डब्यातल्या सगळयाच्या मूत्यूमुखी असण्याची खबर होती. सगळं आता… जर तर वर येऊन ठेपलं होतं…सगळे जर तिकीटावरील योग्य वेळी गेले असते तर काळाचा घाला नक्की होता… सगळं वातावरण शांत होतं… ”आणि मी यांच्या सोबत जाण्याचा हटट धरत होतो” मी एकाटाच स्वत:शी पुटपुटत होतो. मघासपासून एकमेकांवर आगपाखड करणारे सगळेजण, कसं त्यांच्या टाईमिगंकडे नकळत दुर्लक्षित करण्यामुळे चुकीच्या वेळी पोचले यांचे दाखले एकमेंकाना देत होते….इकडे मी आता यांच्या सोबत न जाण्याचा निर्णय घेत होतो आणि बाकी सगळे “या टाईमाला बोक्याला पण सोबत न्यायचं” म्हणत होते…..ते जायचं का नाय ते नंतरच नंतर बघू पण सध्या डब्यातल्या जवळ्यावर ताव मारणं सुरु केलं…

-लेखनवाला    

( All Copyrights with The writer . Permission from the writer is mandatory before  publishing the article or the part thereof . Not to be shared in quotes , or paragraphs . If shared online, must be shared in totality . ) 

Leave a comment