नेहमीची संपणारी दिवसाची सुरवात

शहर कधीच जाग झालेलं असतं पण अजून त्यांचा मागमूस तुमच्यापर्यंत पोचलेला नसतो, उपनगरातल्या त्या उंचावरच्या डोंगराळभागात…. झोपडपटटीत…. पार वरच्या कोप-यातल्या चिचोंळ्या गल्लीतल्या चाळीतून थेट सूर्याची किरणं खिडकीतून डोकावतातं… तुमच्या डोळेबंद पापण्यानां त्रास देतं… झोप उडवणं हल्ली बंद झालयं, तुमच्या अगदी समोरची खोली नुकतीच वनप्लसवन केलीय… म्हणजे खोलीच्या वरती अजून एक खोली… साफ दिवसा टयूबलाईट लावायची वेळ येते त्यामुळे….इथे लोकांच्या खोल्यांवर खोल्या व्हायला लागल्यात आणि तुम्ही खितपत पडलाय आई बाबाच्यां जीवावर….त्यांच्यासोबतच दहा बाय दहाच्या खोलीत….या समोरच्या भिंतीमुळें तुमची सहजासहजी झोपमोड होत नाही, पण सकाळी आठचा नेहमीचा गजर लागण्याअगोदरच तुम्ही अंथरुण दूर सारत उठून बसता…. साला हे आता रोजच झालयं… पुढची काही मिनीटं तशीच पेंग येत राहते… शरीराला सवय झालीय…. तितक्यात मोबाईलचा गजर वाजतो… झोपेचा अमंल अजूनही गेलेला नसतो… एवढयात वारासकट मोबाईलच्या तारखेकडे लक्ष जातं…. वार… सोमवार !!! कामावर जायचं असतं… तो गजर सुरु राहण्याअगोदर बंद करता… मोबाईलची बॅटरी उतरलेली असते, मोबाईल चार्जिंगला लावता आणि तडक मोरीत शिरता… पाण्याने भरलेला ताब्या हातात घेता, पारोश्या तोडांवर पाण्याचे फवारे उडवता… अंहाहा… झोप उडते… एक जोरदार चूळ मारत मोरीतल्या भितींवर तोंडातलं पाणी उडवता…. आता दिवस सुरु झाला…हे असचं काहीतरी उगाचचं ठरवता….. काहीतरी आयुष्यात भारी करण्याचा उददेश असतो पण तुम्ही तुमच्याच चक्रात गुतंलेले असता… हे असं कामावर जाणं तुम्हाला रुचत नसतं… पण रोजचा ठरलेला, दिवस जगण्याचा क्रम असतो…. तुम्हाला हे चक्र थांबवयाची खूप इच्छा असते… काहीतरी स्वप्न उराशी असतं…. पण हे चक्र तुटणं मुश्कील वाटतं, रोज असचं चालू राहणार असंही वाटतं…. नाय हे बंद व्हायला हवं….. समोर मोरीत ठेवलेला टूथपेस्ट, टूथब्रश घेता… समोर आरसा….. स्वतःचा चेहरा बघता… कसं होणार आपलं… दातनदात घासत सुटता… तोंड अख्खं आतून फेसाने भरुन जातं… काय करायचं…  काय करायचं… तुम्ही विचार करत सुटता… नेमकं कसं आपणं उदयाला मोठं होणार? इथं असं किती दिवस खितपत पडणार… रोज रात्री निव्वळ स्वप्नचं बघत बसणार काय?… तुम्हाला देखील पैसा हवायं… हो तरुण वयात… समोर मोरीच्या कठडयाला लागून ठेवलेला हंडयात तांब्या बुडवता…. पाणी तोडांत ओतता…. जोराजोरात चूळ भरु लागता…. आणि एका झटक्यात सगळं पाणी फवा-यासारखं तोडाबाहेर फेकता…. हे सगळं उगाचचं करतायं… काहीतरी सापडेल मनाला… पण काहीही मनाला पक्कं असं सापडत नाही…. पोट साफ करणं बाकी असतं…. तुमची लगबग सुरु होते… दाराबाहेर भरलेलं चिपाट उचलता…. सकाळ असून सुदधा सार्वजनिक संडासापाशीची नेहमीची गर्दी आज नसते…. हायसं वाटतं… त्या स्टायल लावलेल्या संडासात तुम्ही शिरता. कढी लावता….. चिपाट एका कोप-यात….. पटापट चडडी अर्धवट उतरवता… …बसता….अहाहा…. हीच वेळ असते हलकेपणाने विचार करायला….. कसं तोडायचं हे चक्र… रोजची पोट भरण्यासाठी करायची कसरत मनाला मान्य नसतं, आतल्या आत मन खातं असतं… भले स्वतःला अजून ओळखता आलं नसलं तरी हे कामावर जाऊन राबराब राबणं करत बसू नये हे मात्र सारखं मन सांगत सुटत…. मनाची समाधानी होईल असं काही होतं नसतं… हतबलता! हो हाच तो शब्द जो या क्षणाला योग्य वाटतो… पोट साफ व्हायच्या तयारीत असतं… बाकी अपेक्षेप्रमाणे काही झालं नाही म्हणून काय झालं किमान ती आभाळा येवढी मोठमोठाली स्वप्नाची चित्र डोळ्यासमोर बघायला काय हरकत हाय आणि म्हणून तुम्ही त्या तयारीला लागत एक एक खूणगाठ बांधायला पुढे सरसावता…. एवढयात सार्वजनिक संडासाचा दरवाजा ठोकावला जातो… ”कोण गेलं गं….दरवाजा ठोकून तर बघ…. इथं लोकांना कामाला जायचं, तासतासभर बसायचं तर या म्हणावं सकाळी दहा नंतर बसा वास घेत संध्याकाळपर्यंत” बायका ना काही थारा नाही….हो इथं पुरुष-बायका एकाच ठिकाणी येतात संडासला…. अचानक ठोकवण्याने थोंडेसे गडबडता…. पुढे अजून बाता सुरु होणा-या अगोदर तुम्ही आटपता… पाणी ओता… संडासाचा दरवाजा उघडता… दरवाजापाशी चार चिपाट लागलेली असतात…. निमूटपणे निघता…. चपला, चिपाट घराबाहेर ठेवत… घराबाहेरच्या ड्रमातलं पाणी मगाने घेत…. हात-पाय धूत मोरीत शिरता… आघोळींच पाणी आधीच आईने तापवत ठेवलेलं असतं… तुम्ही गॅस बंद करता… ते तापलेलं तपेलं स्टीलच्या बादलीत ओता… पाण्याच्या गरम होण्याचा अंदाज हात लावून घेत पाणी कोमट करण्यासाठी मोरीतल्या एका बाजूला ठेवलेल्या प्लस्टिकच्या ड्रमातलं थंड पाणी मगाने बादलीत ओतता, त्या कोमट पाण्यात आता डेटॉलचे चार पाच थेबं ओतता… पाणी थोडसं फेसाळ होतं… नेमकं काय करुन मोठं होणार यांचा विचार संपत नाही… बादलीतलं पाणी मगात घेतं डोक्यावरुन ओतता… मघापासूनं चालेलं विचाराचं थैमान थांबत…. कोमट पाणी… अंदाज चुकतो… पाणी गरमच असतं… गरम गरम पाणी डोक्यापासून पायापर्यंत येत… साबण आरपार अंगाला लावतो… कपडे काढले जातात… अंग अंग सफेद फेस होऊन जातं… नागडया अंगावर घडाघडा पाणी ओतत राहता… एकदाची आघोंळ संपते… पण तो सकाळपासूनचा विचार काही डोक्यातून निसटत नसतो…. मोठे कसे होणार… वय वा-यासारखं उडत चालयं… आपलं कश्यातच काय नाय… कसं तोडायचं हे चक्र…. हे असं जगणं तुम्हाला कधीच मोठं बनवू शकत नाही… तुम्ही आता अंग पुसायला टॉवेल शोधता… आज पुन्हा एकदा तुम्ही ते मोरीत न्यायला विसरलेलें असता… पुढच्या वेळी नक्की आंघोळीच्या वेळी टॉवेल सोबत घेण्याचा निश्चय करता खरे, पण दरवेळी हे असंच होतं राहतं… इतक्यात आईला टॉवेल न घेतल्याचं कळतं… टॉवेल मिळत पण त्यासोबत तुमच्या निष्काळजीपणाचे, अपयशाचे वाभाडे सुरु होतात…. तुमच्याजवळ प्रत्युत्तरादाखल उत्तर तयार असतात पण तुम्हाला सकाळी सकाळी ते सगळं नको असतं..…घरात क्लेश नको असतो…. टॉवेल कमरेभोवती गुंडाळत उघडया अंगाने मोरी बाहेर येता… तुम्ही ते ओले कपडे स्टीलच्या बादलीत टाकून बाहेरच्या कपडे धुवायच्या टबात टाकायला म्हणून घेवून येता… आंघोळी केल्यामुळे जरा बरं वाटायचं सोडून गरमी वाढलेली असते… डोक्यावर फिरणारा पंखा अजून फास्ट करता, एका बाजूला दोरीला लटकवलेला अंडरवेअर उडी मारत घेता….. आता टॉवेल तिथंच टेबलावर टाकणार इतक्यात मागचं निष्काळजीपणाबददलच्या परायणापासूनच्या बोलणीपासून वाचण्याकरता सरळ कपडे धुवायच्या टबात टॉवेल टाकता, दोन-तीन मिनिटानंतर गरम गरम चहा समोर येतो… नवीन तरतरी येते… एव्हाना कामावर जायच्या तयारीला लागता…. अंगावर फॉर्मल शर्ट-पॅन्ट चढवता, दिवसभर राबण्यासाठी मन तयार होत असतं, आईने भरुन ठेवलेला डबा बॅगेत भरणं चालू असतं, आई र्फमान सोडत असते “हे घेतलं का?, ते घेतल का?”, “हो डबाही बॅगत भरुन झाला, पाण्याची बॉटल ही भरुन झाली”, तुम्ही सांगता, फॉर्मल पॅन्टमध्ये इन केलेला शर्ट दोन-तीन वेळा आरश्यात बघणं चालू असतं… “रुमाल घेतालास का?” आई रुमाल पुढे करते. पटकन रुमाल खिश्यात टाकता… पण सतत तोच विचार…. कधी सुरु होणार तुमचं तुमचं जग….तुमच्या आकाक्षांचं… कंगवा आज मनासारखा फिरत नसतो, भांग काही नीट पडत नसतो… आरश्याकडे बघण्याची त-हा बदलत राहते…..शेवटी एकदाची हौस भागते… वाटतयं थोडं थोडं आता परफेक्ट… पण तरी पण काही तरी जुळून येत नाही… चेहरा ! नाही समाधान देत….गोरा रंग नाय वाटतं…. शेवटी पावडरचा डबा काढताच, आणि हा, थापता तोंडावर… शेवटी एकदाचं मनासारखं समाधान झालं की पायात बूट घालायला मोकळे… चार्जिंगला लावलेला मोबाईल काढता आणि पॅन्टच्या उजव्या खिश्यात टाकता, पाठीवर बॅग लटकवून “येतो गं” ची आरोळी ठोकून घराबाहेर पडता, सकाळचे पावणेनऊ झालेत… तुम्ही झोपडपटटीच्या गल्लीतून बाहेर पडता, आता समोर सूर्य दिसतो… तुम्ही राहत असलेल्या उंच्यावरच्या वस्तीवरुन खालती तीन किलोमीटर लांब असलेली शहरातल्या नामी बिल्डरने बांधलेला एरियातल्या सगळ्यात उंच इमारत……तिचा शेवटचा मजला इथं उभा राहून नजरेसमोर सहज दिसतो…. आपण कसं इंथपर्यंत पोचणार?…. तुमचे प्रश्न आ वासून उभे असतात. तुम्हाला घराच्या भितींचं प्लॉस्टर निघालचं आठवतं…. तुम्ही आता त्या उंचावरच्या वस्तीतून खाली पाय-या उतरत खाली पोचता… लादीकरण नव्याने सुरु केलयं…. कसं कळलं? बॅनर लावलाय कार्यसम्राटाचा…. मध्येच सभोवारच्या इतर झोपडपटटीकडे नजर जाते… हे लोक पण जगतात की तुम्ही पण जगा… कशाला अपेक्षा स्वतःकडून… पण तुम्ही वेगळे आहात इतरापेक्षा…. दाखवून दया… एकदाच्या पाय-या संपतात… किती आहेत? पुढच्या वेळेला नक्की मोजू… तुम्ही रस्त्यावर चालत रहता, अजून दहा मिनिटावर बस स्टॉप! हा तोच बस स्टॉप जिथून बस पकडून आपण रेल्वे स्टेशनला दहा मिनिटात जाऊ, जो असा नुसता चालत गेल्यावर तीस मिनिटात रेल्वेस्टेशनला पोचवेल. तुम्ही बसस्टॉपपाशी येता…. भलीमोठी लाईन दिसतेय म्हणजे मागची दहा मिनिट बस आली नसणार…. अंदाज खरा असतो…. आपल्याला ईथें थांबण्यात काही अर्थ नाही….. तुम्ही पायी चालत रेल्वेस्टेशन गाठायचं पक्क करता. तेवढेचं पैसे वाचवण्याचा हेतू, नाहीतर अजून येथे अर्धा तास वाट बघायचो आणि बस काही यायची नाही… सकाळच्या वेळी ऊन जाणवतं नसलं तरी इतकं वीस-पंचवीस मिनिटं चाललं की घाम येणं साहजिकचं असतं… पुन्हा ते मागचं थाबलेलं विचाराचं थैमान चालू होतं….आपल्यासारखेचं पायी चालणारें माणसांचें जथैच्या जथै रेल्वे स्टेशनच्या दिशेने जाताना दिसतात… तुम्ही त्यांच्यापैकीच एक असतात… मग काही वाटत नाही…. आता तुमच्या मनाची रुखरुख थोडी कमी होते… मगाची बस आता तुमच्या समोरुन निघून जाते… तुम्ही घेतलेला निर्णय योग्य असल्याचं मन उगाच सांगून जातं… पार बसची शेवटची पायरीही दिसेनाशी होईपर्यंत लोक प्रवास करत असतात. तरी अजून अर्धा रस्ता बाकी असतो…..तुम्हाला बाजूने रेल्वेस्टेशनला जाणा-या टू व्हीलरवाल्याचा हेवा वाटतो… कसं पटकन स्टेशन गाठेल ना आता आणि तुम्ही राहा, चालत… वरती डोंगरावरच्या झोपडपटटीतून वरच्या मजल्या समोरासमोर दिसणारी इमारत आता मेन रस्त्यापाशी येताच आपली खरी उंची दाखवून देते, तुम्ही ठेगणें दिसू लागता…पार मान मोडेस्तोवर वर बघता तरी शेवटचा एक दुसरा मजला काही दिसत नाय….असं काय केलं की मोठं होवू… वीस मिनिट होतं आली. चालत चालत मोबाईलचा डेटा चालू करुन फेसबुक खोलावसं वाटतं पण नाही मन नाही करत… रात्री एक वाजला तरी सोडवत नाय व्हॉटस अप आणि फेसबुक, उगाचच ते इन्सापायर करणा-या शब्दाच्या चौकटी, जातीअभिमानी पोस्ट, नेतेमंडळीची भलामण, नकळत हळूच डोकवणा-या जाहिराती… नको आता सकाळी… सकाळी-सकाळी तरी नको… च्यायला आपणचं सगळं हे लाईक, फालो करुन ठेवलयं… आणि चटक होऊन बसलीयं… दर मिनिटातासागणिक बघितलं नाय की कसतरीचं होतयं… .काहीतरी राहून गेल्यासारखं… पण आज नाहीच चालू केलं… मोबाईल पण हल्ली हॅग व्हायला लागलायं… झाली चार वर्ष त्यालासुदधा… दिवस भरतं आलेयत त्याचें पण… थोडं जपून… रस्त्यावरचा हा खडडा….तिथंच तुटलेली पाईपलाईन… त्यामुळे साचलेलं पाणी… आणि तिथं गाडी जावू नये म्हणून गाडी वळवत चालवणा-याची धडपड… पण बसवाला काय करेल… त्याला तर या अरुंद रस्त्यातून त्या खडडातूनच जावं लागेल….बस जवळ आलीय…. बाजूच्या रस्त्याकडेने चालणारे तुम्ही झपाझप पावलं टाकता का तर ते खडडयातलं पाणी, चिखल तुमच्या पॅन्टीवर, अंगावर उडू नये म्हणून….नाय उडलं…. फायनली….. तुम्ही आजूबाजूच्या रहदारीसोबत वाट काढत पटापट चालत मेन रस्त्यावर येता तो रस्ता ओलांडला की पलीकडे रेल्वे स्टेशन…

नऊ वीस झालेत…बसस्टॉपपाशी लोक उतरत असतात…पेपर विकणारे, मेदूंवडे, कांदेंपोहे विकणारे, गजरे विकणारे, त्यांना रेल्वे आवारात न येऊ देण्यासाठी हल्ली डयूटीवर दिसणारे रेल्वे पोलीस….सगळी धावपळ… हे शहर जिवंत तर असतं पण तिच्या जाणतेपणाची जाणीव करुन देणारा परमोच्च बिंदू म्हणजे सकाळी नऊ दहाच्या सुमारास फुलणारा रेल्वे आवार… एक उत्सव दररोजाचा… खूप सा-यां रिक्षाचीं एका मागोमाग एक फे-या सुरु असतात… स्टेशनातून बाहेर पडणारा प्रत्येक प्रवासी आपल्या रिक्षात बसवून घेण्यासाठी तातकळलेले रिक्षाचालक…. “मच्छी का पानी” असं जोरजोरात ओरडत आजूबाजूची गर्दी पागंवणारे हमालवाले.. त्यांच्या त्या नेहमीच्या ठरलेल्या रिक्षात मच्छीच्या फाटयाच्या फाटया टाकत मच्छीमार्केटकडे निघतात….. दादरच्या फूलमार्केटमधून पहाटे जाऊन मोठा गोणता भरुन आणलेली फुलं…. त्याचवेळी कचरा गोळा करत घंटागाडीत टाकण्यासाठी आलेले सफाई कामगार, स्कॉयवॉकवर टवाळ्या करणारी कॉलेजची मंडळी… तिकीट कांऊटरपाशीची मिनिटामिनिटाला वाढणारी-कमी होणारी रांग…. त्यांच्याजवळ जाऊन भीक मागणारे भिकारी… त्यांची पोर… तुम्ही यांच्यापेक्षा निश्चित चागलं जगताय! पण नाही तुम्हाला तुमच्या जवळ नसलेल्या गोष्टीची ओढ लागलीय.

 ही जी गर्दी दिसतेय….. त्या गर्दीतले तुम्ही एक… हर एक जण आपल्याआपल्या तंद्रीत स्टेशन गाठण्यात आणि स्टेशनातून बाहेर पडण्यात दंग…. समोर आसपास बॅनरची दाटी… अनेकांच्या शुभेच्छा, सत्कार, मागण्या, निषेध, आदोलंन, जंयत्या हरएकप्रकारचे बॅनर… मशीनवर तिकीट काढण्यासाठी तुरकळ गर्दी. तुम्हाला यांची गरज नसते तुमचा पास असतो आणि तो संपायला अवकाश आहे… तुमची पावलं प्लॅटफॉर्म नंबर एकच्या दिशेने वळतात… तीच नेहमीची दुनिया… गाडीची वाट पाहणारे प्रवासी… तुम्हाला निश्चितस्थळी जाणारी गाडी पकडायची म्हणजे समोर दिसणा-या प्लॅटफॉर्म नंबर दोनवर या पेक्षा जास्त गर्दी असणारं… साहजिकच होतं… ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणारी गर्दी….प्रवासी… निव्वळ खालती पायाकडे बघत बूट दिसले की खूश होणारे बूट पॉलिशवाले… सुटे पैसे टाकून वजन सांगणा-या मशनी, प्रवासांची तिकीटं तपासणी करणारे तपासणीस….. सगळं रोजच्यासारखं चालू असतं. साडेनऊ वाजलेत आणि तुमची साडेदहाची डयूटी… तितक्यात अनाऊसमेंट होते….. प्लॅटफॉर्म नंबर तीन वर फास्ट लोकल येण्याची… म्हणजे येथून थेट निश्चित स्टेशन… हो आणि ट्रेन टाईमावर होती… सगळं वेळेवर चालयं… फास्ट लोकलच ती… गर्दी का म्हणून नसणार… तुम्ही तडक एक नंबरवरुन तीन नंबर प्लॅटफॉर्मवर जाऊन उभे राहता… गाडी येते… उतरणारे प्रवासी लगबगीने उतरतात, तरीदेखील शिरण्यास वाव नाही…. तुम्ही शिरता… गाडी सुरु होते…. कोबंत चाललेल्या जमावात तुम्ही शिरता… पाठीमागून अजून गर्दी तुमच्या अंगावर येते, मगासपासून पाठीला लटकवलेली बॅग आता तुम्ही पुढे पोटाशी पकडता… पाकीटचोरी ते खिसेकापू सगळ्या विचारांची एक एक चेकलिस्ट सुरु करता, पॅन्टच्या डाव्या खिश्यात मोबाईल, उजव्यात हातरुमाल तपासून बघता… सगळं काही सुरळीत सुरु आहे…. गर्दी आता आतल्या बाजूला पांग्याला लागलीय…. तरीदेखील किती पांगणार…. आतली माणसं पण बहुतेक तुमच्या निश्चितस्थळी उतरणारी होती…..     

सकाळी पावणेदहा वाजताची वेळ, छत्रपती शिवाजी महाराज टमिर्नसकडून निघालेली जलद रेल्वेगाडी नेमकी स्टेशन घेतं निश्चित स्थळाच्या प्लॅटफॉर्म नंबर तीनच्या दिशेने यायला निघाली….. निश्चित स्टेशनला उतरण्यासाठी आतली सारी गर्दी तयारीला लागलीय, पंधरा-वीस सेकंद उरली असतील, गाडीच्या दरवाजावरची मंडळी तयारीतच होती, आतले बसलेले प्रवासी ही उभे राहायला लागले होते, गाडी ही टाईमावर असल्यामुळे तशी तक्रारही काही नव्हतीच, अजून तरी सगळं काही सुस्थितीत होतं, एकदाची गाडी स्टेशन आवारात आली, नेहमी प्रमाणे दरवाज्या जवळच्या व्यक्ती एकएक करत बाहेर पडले, गाडी पूर्णपणे थांबण्याअगोदर, ब-यापैकी लोकं उतरलीसुदधा….. तरी आतमध्ये ब-याच घोळका बाकी होता, आता लगबग गाडीतून उतरण्यांपेक्षा चढण्या-ची किंचीत जास्त असते, पण गाडीच्या आतल्या घोळक्याला बाहेर निघाल्याशिवाय आत शिरण्यास आणि जागा मिळण्यास वाव मिळणं शक्य नसतं, एकामागोमाग लोकं झपाझप उतरत असतात, अश्या गर्दीच्या मधोमध उभं राहायलं की बाहेर पडण्याची चिंता नसते तुम्ही अगर्दी सहजपणे बाहेर फेकले जाता, फक्त कामावर जाण्याचा मूड बनवण्यासाठी म्हणून घरुन मस्त करुन आलेला डोक्यावरचा भांग, इन म्हणून पॅन्टीत फॉमल म्हणून खोचलेलं शर्ट…. हे पार विस्कटून जातं…. बाहेर पडल्यावर… पार बुजगावणं होतं…. आतल्या माहौलातून सावरण्यात एक दोन सेकंद जातात, एकदा पुन्हा गाडीकडे नजर जाते, दहा सेकंद अगोदरची भरलेली गाडी आता रिकामी होते… मगाशी तातकळत बाहेर थांबलेली माणसं आता लगबगीने गाडीत बसतात, आपण मात्र पुन्हा त्या उतरलेल्या गर्दीसोबत स्टेशनातून बाहेर पडण्यासाठी पुढे निघून जातो, आधीच अवघडलेल्यापणातून सुटका करुन घेत सावरत समोर पाय-याच्या दिशेने चालायला लागतास, पुन्हा एकदा बॅग, दोन्ही खिसे तपासता, संगळ जागच्याजागी…. बाजूला एक्सलेटर नजरेस पडतं…. आपोआप वर सरकणारी माणसं दिसतात, आजूबाजूला अजूनही माणसांचा लोट कायमच असतो, ती आपण उतरलो ती गाडी निघते, आता कल्याण स्थानकाच्या दिशेने येणारी गाडी फलाटावर यायच्या तयारीत असते हो याच प्लॅटफॉर्मवर… प्लॅटफॉर्मच्या दोन्ही बाजूला रेल्वे रुळ असल्यावर गर्दी वाढणारच ना….लगबगीने पाय पुढे ढकलण्याशिवाय पर्याय नसतो. पण पुढचा रेटा मंद गती सोडत नाही, चकलीच्या साच्यात भरगच्च भरुन टाकलेल्या पीठासारखे माणसांचे लोढेंच्या लोढें एक्सलेटरपाशी जोरात दिलेल्या दबावापायी तारकेचा आकारावाल्या चकतीच्या भोक्यातून बाहेर पडणा-या पीठासारखी एकसंध….. केवळ दोन-दोन माणसं पुढे-पुढे सरकणा-या पाय-यावर पाय लगबगीने टाकत होती…. आता तुमची समोर जाण्याची वेळ येते, हो समारेची गर्दी पागेंपर्यंत आपण तिथे जाईपर्यंत गोंधळ होतो…. पण एकदा का एक्सलेटरवर पाय ठेवला की नो टेशंन काही न करता आपोआप डायरेक्ट वरच्या पूलावर पोचणार… तुम्ही त्या वरच्या एक्सलेटरवरच्या टोकाच्यां माणसाकडे बघत पोचायचे आराखडे बांधता…. आठ-नऊ सेकंदाचा छोटासा टारगेट… तुम्ही देखील ढकलाढकलीचा भाग बनता… आता पुढच्या सेकंदाला समोरची गर्दी संपून पाय एक्सलेटरवर पडतो…तुम्ही पुढे पुढे सरकू लागतात, इतक्यात ती मघाशीच आपोआप चालणारी माणसं तुम्हाला थांबताना दिसतात, नाही सगळेच थांबतात, मग लगेच दुस-याला क्षणाला काय घडलयं लक्षात येतं…..चला चला पटापट…एक्सलेटर बंद झाला…मशीन बंद झाली… तुमच्या, पुढचा प्रवासी, चुन्याची पुडी पॅन्टीच्या खिशात ठेवत गर्दीतल्या रेटयातून हातावर तंबाखू मळत तिरकसपणे आरोळी ठोकायला लागतो “चला पटापट… अच्छे दिन आ गये” तुम्ही त्या नेहमीच्या पाय-या चढतानाचा आवेश आणत त्या एक्सलेटरवर जोरजोरात पाय आपटत, मेटाकुटीतला हा प्रवास संपवता… आजचा दिवसही तसाच जाणार, काहीही नेहमीपेक्षा वेगळं होतचं नाही, तुम्ही अजूनही वाट बघतायं चक्र तोडण्याची….….

-लेखनवाला


( All Copyrights with The writer . Permission from the writer is mandatory before  publishing the article or the part thereof . Not to be shared in quotes , or paragraphs . If shared online, must be shared in totality . ) 

Leave a comment